(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अनिल कपूर आणि राधिका मदान अभिनित ‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ हे दमदार गाणे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या जोशपूर्ण अँथममध्ये भारताचे एक्स क्रिकेटपटू हरभजन सिंह विशेष उपस्थितीत झळकले आहेत. त्याचबरोबर ‘भारत आर्मी’ आणि शेफाली बग्गा यांचीदेखील प्रभावी झलक या म्युझिक व्हिडिओत पाहायला मिळाली आहे. रोहन-विनायक यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे गीतलेखन ऋषी उपाध्याय यांनी केले असून, प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांनी आपल्या दमदार आवाजात हे अँथम सादर केले आहे.
संपूर्ण देश टीम इंडियाला पाठिंबा देत असताना प्राइम व्हिडिओने ‘द लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’च्या माध्यमातून चाहत्यांचा उत्साह आणखी वाढवला आहे. हा हाय-एनर्जी ट्रॅक आगामी अॅक्शन-ड्रामा चित्रपट सूबेदारमधील ‘लल्ला’ या मूळ गाण्यावर आधारित आहे. क्रिकेटच्या हंगामातील जोश, स्टेडियममधील जल्लोष आणि देशभक्तीची भावना यांचा सुरेख संगम या अँथममध्ये पाहायला मिळतो आहे.
‘सूबेदार’ हा चित्रपट भारताच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असून अर्जुन मौर्य (अनिल कपूर) या व्यक्तिरेखेचा प्रेरणादायी प्रवास यात उलगडणार आहे. शिस्त, अभिमान आणि अढळ नैतिक मूल्यांवर जगणारा अर्जुन मौर्य प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जातो. लवचिकता, सन्मान आणि कर्तव्यनिष्ठा या भावनांचा ठसा चित्रपटात ठळकपणे उमटतो आहे. ज्या भावना मोठ्या जागतिक स्पर्धांदरम्यान प्रत्येक भारतीयाच्या मनात जागृत होतात.
या म्युझिक व्हिडिओत स्टेडियममधील उत्साह आणि सिनेमॅटिक तीव्रतेचा प्रभावी मिलाफ साधण्यात आला आहे. हरभजन सिंह यांच्यासह अनिल कपूर आणि राधिका मदान यांची उपस्थिती गाण्याला अधिक आकर्षक बनवते. ‘भारत आर्मी’ आणि शेफाली बग्गा यांच्या सहभागामुळे गाण्यात आत्मविश्वास, स्वॅग आणि राष्ट्रीय अभिमानाची ठळक झलक दिसून येते आहे. रोहन-विनायक यांच्या जोशपूर्ण संगीतासोबत ऋषी उपाध्याय यांच्या प्रभावी शब्दांची जोड आणि विशाल ददलानी यांच्या दमदार आवाजामुळे हे गाणे आणखी खास बनले आहे.
अनिल कपूर यांनी या गाण्याबद्दल मत मांडताना म्हणाले की, “‘सूबेदार’ ही अशा व्यक्तीची कथा आहे ज्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव आणि अंतर्मनातील ज्वाळा यांतून शक्ती मिळते. ‘लल्ला अँथम’ त्या ज्वाळेचे प्रतिबिंब आहे. सूबेदार अर्जुन मौर्य शांत आणि संयमी असला तरी योग्य वेळी ठामपणे उभा राहतो. सेटवरील ऊर्जा अप्रतिम होती. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.” असे ते म्हणाले आहेत.
हरभजन सिंह यांनीही आपला आनंद व्यक्त करत म्हटले की, “‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’चा भाग होणे हा विशेष अनुभव होता. अनिल कपूर यांच्यासोबत काम करणे म्हणजे एका संस्थेसोबत काम करण्यासारखे आहे. त्यांची ऊर्जा प्रेरणादायी आहे. या गाण्याची बीट दमदार असून क्रिकेटच्या सध्याच्या उत्साहाशी ती पूर्णपणे सुसंगत आहे.”
‘भारत आर्मी’नेही प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आमच्यासाठी क्रिकेट म्हणजे उत्कटता, विश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत संघाच्या पाठीशी उभे राहणे आहे. ‘लल्ला – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’मध्येही तीच ज्वाला आणि अभिमान जाणवतो.” या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे. ‘तुम्हारी सुलु’, ‘जलसा’ आणि ‘दलदल’ यांसारख्या उत्कृष्ट कथांसाठी ते ओळखले जातात. तसेच चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी यांनी केली आहे. ‘सूबेदार’ हा चित्रपट ५ मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून भारतासह २४० हून अधिक देशांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.






