‘येक नंबर’मधील भूमिकेवरून अभिनेत्याचं मोठं वक्तव्य; राज ठाकरेंबाबत केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
गेल्या काही दिवसांपूर्वी तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला ‘येक नंबर’ चित्रपट रिलीज झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत धैर्य घोलप, सायली पाटील आणि विशाल सुदर्शनवार आहेत. नेते राज ठाकरे यांची भूमिका अभिनेता विशाल सुदर्शनवार याने साकारली आहे. त्याने यापूर्वी काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
चित्रपटांत राज ठाकरे यांची भूमिका साकारलेल्या विशालने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर जेव्हा तो खऱ्या आयुष्यात राज ठाकरे यांची त्याने भेट घेतली होती त्यावेळची त्याची प्रतिक्रिया पोस्टमधून मांडली आहे. पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्याने आपला अनुभव शेअर केला आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘येक नंबर’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत धैर्य घोलप आणि सायली पाटील व्यतिरिक्त विशाल सुदर्शनवार, तेजस्विनी पंडित, पुष्कर श्रोत्री, संजय मोने, आनंद इंगळे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
विशाल सुदर्शनवार पोस्ट शेअर करत लिहिले की, ” १६ जानेवारी २०२४, वेळ- सकाळी पहाटे, माझा फोन वाजला, फोन उचलल्यावर समोरून रोहन सरांचा आवाज आला, “ज्युनियर शाहरूख खान… ऑडिशनसाठी क्लिन शेव्ह करून ये” असं त्यांनी मला फोनवर सांगितलं. तर तितक्यात मी त्यांना प्रश्न केला, “मी खरोखरंच शाहरूख खानसारखा दिसतो का ?” ते म्हणाले, “माझ्यावर विश्वास ठेव, तू ये…” त्यांचा फोन ठेवला आणि तयारी करून मी ऑडिशन रूममध्ये जाऊन पोहोचलो…”
विशालने पुढे पोस्टमध्ये लिहिले, “जवळपास दोन वर्षांनी मी क्लीन शेव्ह करून ऑडिशनला गेलो होतो. शाहरुख खानच्या भूमिकेला साजेशा अशा काही ऑडिशन्स मी दिल्या. त्यानंतर रोहन सरांनी माझ्या हातात पांढरा कुर्ता आणि चष्मा दिला. ते दिल्यानंतर रोहन सर मला म्हणाले, “ऐक शाहरुख खानबद्दल आता विसर… आणि राज साहेबांना डोळ्यासमोर ठेवून ऑडिशन दे. रोहन सरांचे ते शब्द ऐकून माझ्या हृदयातली ती धडधड आणखीन वाढली. हाच तो क्षण… माझं स्वप्न पूर्ण होणार होतं. मी लगेच माझा चष्मा नीट केला. व्यवस्थित तयार झाल्यावर आम्ही दिग्दर्शकांची वाट पाहत थांबलो होतो.”
हे देखील वाचा- अखिल सचदेवा आतिफ अस्लमच्या तेरे बिनच्या जादूला देणार नवीन वळण
“काही वेळानंतर ऑडिशन रूममध्ये निर्मात्या तेजस्विनी पंडित मॅम आल्या. मनमोकळं स्मितहास्य करत त्यांनी मला अभिवादन केलं. त्यानंतर त्या म्हणाल्या… चल, दिग्दर्शकांना तुला भेटायचंय. त्यांनी मला गच्चीवर जाण्याचा मार्ग दाखवला. गच्चीत गेल्यावर मी डाव्या बाजूला वळालो आणि समोर स्वत: राजसाहेब बसल्याचं पाहिलं. जवळपास ६ वर्ष डोळ्यात साठवलेली त्यांची प्रतिमा, त्यांना टीव्हीवर पाहणं आणि त्यादिवशी त्यांना प्रत्यक्ष पाहणं हे सगळं भारावून टाकणारं होतं. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद, लोकांचं प्रेम पाहून प्रचंड आनंद झाला. डोळ्यात आनंदाश्रू होते…” अशी पोस्ट शेअर करत विशाल सुदर्शनवारने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटल्यानंतरची प्रतिक्रिया शेअर केली आहे.