गणेशोत्सवाच्या काळात जमणाऱ्या लोकवर्गणीतील ४० टक्के निधी हा गणेशोत्सवासह, नवरात्रौत्सव आणि शिवजयंती यांसारख्या उत्सवावर खर्च होतो तर उर्वरित ६० टक्के निधी समाजकार्यासाठी वापरला जातो. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेचा पायंडा याच मंडळाने पाडला,पुढे तो अनेक मंडळांनी स्विकारला. चिंचपोकळी च्या चिंतामणी ला २०११ मध्ये ‘मुंबईचा राजा’ या किताबाने गौरविण्यात आले.
ग्रेट भेट…
मंडळाच्या गणेशोत्सवात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सारख्या राष्ट्रपुरुषांबरोबर शरद पवार, नारायण राणे, राज ठाकरे, अजित पवार यांसारखे राजकीय नेते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील शिल्पा शेट्टी, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, शिवाजी साटम, सायली संजीव, भाऊ कदम यांच्यासह मालिकेतील विविध कलाकारांनी भेट दिली आहे.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यावर्षी सरकारने उत्सवातील नियमात शिथिलता आणल्याने चिंतामणी भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर्षी आगमन सोहळ्यात जवळपास मुंबई तसेच ठाणे आणि इतर ठिकाणाहून हजारो भक्तांनी उपस्थिती लावली होती.
यावर्षी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने यक्षिणी दरबाराची सजावट साकारली असून यक्षिणीच्या विविध मुर्ती दरबारात साकारण्यात आल्या आहेत. या नेत्रदीपक दरबाराचे कला दिग्दर्शक अमन विधाते असून यासाठी प्रकाश योजना विशाल शेलार यांची आहे. तसेच चिंतामणी ची सुबक मुर्ती प्रसिद्ध मूर्तीकार रेश्मा खातू यांनी साकारली असून वेशभूषा प्रकाश लहाने यांची आहे. चिंतामणी ची सुबक मूर्ती १२ फुटाची असून संपूर्ण मूर्तीची उंची २० फूट आहे.