दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दिल्लीतील 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 8 फेब्रुवारी रोजी निकाल हाती येणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. आम आदमी पक्ष, भाजप आणि कॉंग्रेसमध्ये लढत होणार आहे.
Delhi Assembly Election 2025 Case registered against AAP, BJP and Congress candidates
दिल्लीवर सत्ता मिळवण्यासाठी तिन्ही पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. दिल्लीमध्ये प्रचाराचा धुराळा उडाला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सर्व पक्ष एकमेकांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये पत्रव्यवहार, शीशमहाल आणि यमुनेतील विषप्रयोग या मुद्द्यांवरुन राजकारण रंगलं आहे. यामध्ये आता 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्यावरील गुन्हेगारी खटल्यांची माहिती समोर आली आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि दिल्ली इलेक्शन वॉचच्या अहवालानुसार, दिल्ली निवडणूक लढवणाऱ्या 699 उमेदवारांपैकी 132 उमेदवारांविरुद्ध फौजदारी खटले घोषित करण्यात आले आहेत. या अहवालानुसार, आम आदमी पार्टीचे या यादीत सर्वांत जास्त नेते आहेत.
अहवालानुसार, आम आदमी पक्षाच्या 70 उमेदवारांपैकी सुमारे 44 उमेदवारांवर गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले आहेत. तर काँग्रेस या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. पक्षाच्या 70 पैकी 29 उमेदवारांनी आणि भाजपच्या 68 पैकी 20 उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात स्वतःविरुद्ध गुन्हेगारी खटले असल्याचे जाहीर केले आहे
या अहवालानुसार, यावेळी दिल्ली निवडणुकीत 13 महिला उमेदवारांविरुद्ध गुन्हेगारी खटले घोषित करण्यात आले आहेत. याशिवाय, दोन उमेदवारांनी स्वतःविरुद्ध खुनाशी संबंधित खटले घोषित केले आहेत. तर पाच उमेदवारांनी खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित गुन्हे दाखल केले आहेत.
एडीआरचा हा अहवाल निवडणूक लढवणाऱ्या ६९९ उमेदवारांच्या विश्लेषणाच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आला आहे, ज्यामध्ये २७८ राष्ट्रीय पक्ष, २९ राज्य पक्ष, २५४ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्ष आणि १३८ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये खुनाचा प्रयत्न यासारख्या प्रकरणांचाही समावेश आहे.
यावेळी दिल्ली निवडणुकीत एकूण 699 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 132 म्हणजेच 19 टक्के उमेदवारांनी स्वतःविरुद्ध गुन्हेगारी खटले घोषित केले आहेत. तर 2020 च्या निवडणुकीत हा आकडा 672 उमेदवारांपैकी 133 होता, म्हणजेच 20 टक्के होता. आता मतदार कोणाच्या पाठिशी मतदानरुपी आशिर्वाद देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.