
सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा देशमुख या दोघांचा आगामी सिनेमा ‘वेड’ हा प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. रितेश आणि जिनिलिया महाराष्ट्रभरात या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने फिरत असून यावेळी जिनिलियाने केलेले काही सुंदर लूक प्रेक्षकांना घायाळ करीत आहेत.

‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटातील सर्व कलाकार येत्या आठवड्यात टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये दिसणार आहेत. यावेळी जिनिलियाने प्रथमच मराठमोळी नऊवारी साडी नेसली होती. यात जिनिलिया अतिशय सुंदर दिसत असून यानिमित्ताने तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

जिनिलियाने या शो मध्ये लाल रंगाची नऊवारी साडी परिधान केली असून त्यावर निळा ब्लाउज घातला आहे. तसेच या लुकला शोभेल अशी ठसकेबाज नथ घातल्याने जिनिलियाचा हा मराठमोळा लूक अतिशय उठून दिसत आहे.

जिनिलियाचा हा लूक सेलिब्रिटी स्टायलिस्ट करिष्मा गुलाटीने डिझाईन केला असून जिनिलिया या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. जिनिलियाच्या या फोटोंवर प्रेक्षक आणि चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.






