गणेशोत्सवाला (Ganeshotsav) आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी गणरायाच्या आगमनाची लगबग पहायला मिळत असून गणरायाला खुश करण्यासाठी सेलिब्रिटीज देखील मागे नाहीत. गणेशोत्सवात कलाकारांच्या घरच्या बाप्पाकडे सर्वांचेच लक्ष्य लागलेले असते. त्यामुळे तो कसा वेगळा होईल यासाठी कलाकार प्रयत्न करत असतात. सध्या गायक आणि अभिनेता राहुल देशपांडे (Singer Rahul Deshpande) आपल्या कुटुंबासमवेत गणेशोत्सवाच्या तयारीत व्यस्त झाला आहे. नुकतेच त्याने काही फोटो शेअर केले ज्यामध्ये तो मूर्ती रंगवताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याचे या माध्यमातून ईको फ्रेंडली गणेशोत्सव करण्याचा संदेश दिला आहे.
पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगवा तुमचा कागदी बाप्पा’ या इको-फ्रेंडली गणेशोत्सवासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष उपक्रमात राहुल देशपांडे सहभागी झाले होते.यावेळी राहुल संपूर्ण कुटुंबासोबत मूर्ती रंगवण्यासाठी सहभागी झाले होते.यावेळी त्यांच्या मुलगी रेणुका आणि पत्नी नेहा यांनी देखील छोटा बाप्पा रंगवून या उपक्रमाचा आनंद लुटला.
या उपक्रमाचे काही फोटो शेयर करून, राहुल देशपांडे यांनी पर्यावरण पूरक बाप्पा साजरी करण्याचा संदेश दिला आहे. ते म्हणतात, ‘शिवाजी नगर येथील पुणे हँडमेड पेपर्सच्या आवारात संपन्न झालेल्या उपक्रमात आज विद्यार्थ्यांसोबत कागदी बाप्पा स्वतः रंगवताना एक वेगळीच उर्जा जाणवली. या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती अनोख्या असून त्या ८०% कापूस-कागदाचा लगदा आणि २०% शाडू माती अशा विशिष्ट मिश्रणापासून तयार केल्या जातात. महत्वाचे म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेला कागद हा वृक्षतोड करून तयार केलेला नसून, वापरलेल्या कागदाची गुणवत्ता सुधारुन म्हणजेच पेपर अपसायकल करून वापरला आहे. या मूर्ती वजनाने हलक्या असतात आणि जलरंगांनी रंगवता येतात अशी माहिती मला शोभना हडप आणि संजीव पवार यांनी दिली तेंव्हा आपण एका चांगल्या उपक्रमाचा भाग झालो याचा आनंद वाटला. यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना आपण सगळेच पर्यावरणाचे भान ठेवूयात.’