कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष होते आणि शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच निरोगी राहण्यासाठी दिवसभरात दोन ते तीन लिटर पाणी पिणे फार आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याचे सेवन न करता कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी शरीरासाठी अमृत मानले जाते. वजन कमी करण्यापासून ते गंभीर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी सुद्धा कोमट पाणी प्यायले जाते. चला तर जाणून घेऊया उपाशी पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
त्वचेवरील तारुण्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे कोमट पाणी, उपाशी पोटी नियमित करा सेवन

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाणी प्यायल्यास शरीरात सकारात्मक बदल दिसून येतील. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत आणि विनाअडथळा चालू राहण्यास मदत होईल.

कोमट पाणी प्यायल्यामुळे केसांच्या मुळांना चालना मिळते आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. केसांच्या घनदाट वाढीसाठी कोमट पाण्यात आवळा पावडर मिक्स करून प्यावी.

आठवडाभर किंवा नियमित कोमट पाणी प्यायल्यास चेहऱ्याचे सौंदर्य वाढेल आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल. चेहऱ्यावरील मुरूम किंवा पिंपल्स नाहीशे करण्यासाठी कोमट पाणी प्यावे.

कायमच निरोगी आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी शरीर स्वच्छ असणे फार आवश्यक आहे. त्यामुळे नियमित उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावे, ज्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी कोमट पाणी किंवा आल्याचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पोटात वाढलेले पेटके कमी होतात.






