फोटो -सोशल मीडिया
गोंदिया : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे इतर पक्षांमधील प्रवेश आणि इच्छुकांचा प्रचार तसेच उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. यामध्ये आत्तापर्यंत शरद पवार राजकीय खेळी खेळताना दिसत होते. शरद पवार गटामध्ये अनेक नेत्यांनी महायुतीला धक्का देत शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भाजपला कॉंग्रेसने मोठा धक्का दिला आहे. गोंदियामध्ये भाजपला कॉंग्रेसने धोबीपछाड केल्यामुळे जोरदार राजकारण रंगले आहे.
भाजपमध्ये असणारे माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काही वर्षांपूर्वी ते कॉंग्रेसमध्ये होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीच्या पूर्वी गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच भाजप सोडण्यामागचे कारण देखील माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.
गोपालदास अग्रवाल यांचीघरवापसी
2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या पूर्वी गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून अग्रवाल आता कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार याची चर्चा रंगली होती. गोपालदास अग्रवाल हे कॉंग्रेसमध्येच घरवापसी करणार असल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. आज (दि.13) गोपालदास अग्रवाल यांचा कॉंग्रेसचा जोरदार शक्तीप्रदर्शन करत पक्षप्रवेश होणार आहे.
प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन
गोपालदास अग्रवाल यांनी भाजप सोडण्यामागेच कारण स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, मी भाजपमध्ये असताना भाजपचे नेते मला सोडून अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांना अधिक महत्व देत असल्याने मला भाजप सोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता गोंदिया विधानसभा निवडणूक जोरदार रंगणार असून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे. गोंदियामध्ये गोपालदास अग्रवाल विरुद्ध भाजपचे विनोद अग्रवाल अशी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात आज काँग्रेस शक्तीप्रदर्शन करून गोपालदास अग्रवाल यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस राज्यामध्ये ॲक्शनमोडमध्ये आली आहे.