संजय राऊतांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मिळणार 1 लाखाचे बक्षीस; शिंदे गटाच्या शिवसेना शहरप्रमुखाची मोठी घोषणा
शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात कायमच आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु असत. मात्र महाकुंभमेळ्यावरुन आता दोन्ही गटातील वाद चिघळताना दिसत आहे. खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण चिघळताना दिसत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात संजय राऊत यांनी केलेल्या वक्ताव्यावरून अहिल्यानगर दिल्ली गेट येथे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले आहे. तसंच संजय राऊत यांच्या तोंडाला जो कोणी काळं फासेल त्यास एक लाख रुपये बक्षीस यावेळी शहर प्रमुख सचिन जाधव यांनी जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी खरं म्हणजे महाकुंभमेळ्यात जाऊन नागा साधू बरोबर जाऊन बसायला पाहिजे होतं. नागा साधूही फार अस्वस्थ असतो, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध करत अहिल्यानगर शहरात शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शहरातील दिल्लीगेट येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
“हे भटकती अन् लटकती आत्मा…”; दावोस दौऱ्यावेळी पक्षफोडीवर टीका करणाऱ्यांवर खासदार संजय राऊत भडकले
आक्रमक झालेल्या शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर शहरात आंदोलन करत संजय राऊतांच्या प्रतिमेला काळं फासलं आहे. दरम्यान शिंदे गटातील शिवसेना प्रमुखांनी सचिन जाधव यांनी सदर प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे. सचिन जाधव म्हणाले की, संजय राऊत अत्यंत खालच्या पातळीला जाऊन बोलणारा माणूस आहे. राऊतांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. नागा साधू अस्वस्थ आहेत आणि एकनाथ शिंदेंनी त्यांच्या बाजूला जाऊन बसावं असं घाणेरडं वक्तव्य करणारे राऊत हिंदूच्या हिताचा विचार काय करणार ? अशी संतप्त प्रतिक्रिया सचिन जाधव यांनी दिली आहे. जाधव पुढे असंही म्हणाले की, शिवसेना ठाकरे गट पूर्णत: लयाला गेला आहे. हिंदूबाबत गैर वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना राज्यातल्या हिंदूंनी काळं फासलं तर त्यांना माझ्याकडून 1 लाखांचे बक्षीस जाहीर करतो अशी प्रतिक्रिया सचिन जाधव यांनी दिली आहे.