भाजपचा सर्वात मोठा विजय; फडणवीसांनी मांडली विजयाची 'ब्लू प्रिंट' (Photo Credit - X)
‘नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूक 2025’मध्ये जनतेने भाजपाच्या उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल जनतेचे मनापासून आभार! आमचे विजयी उमेदवार सदैव आपल्या सेवेसाठी कटिबद्ध असतील! सर्व उमेदवारांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा! #Maharashtra #BJPNo1 #NagarParishad2025… pic.twitter.com/6RnW7UL6e2 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 21, 2025
विजयाची आकडेवारी: महायुतीचा धडाका
या निवडणुकीत महायुतीने जवळपास सव्वा दोनशे जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे:
भारतीय जनता पक्ष (BJP): १२९ नगराध्यक्ष, ३,३०२ नगरसेवक (२०१७ च्या तुलनेत दुप्पट यश).
शिवसेना (शिंदे गट): ५४ नगराध्यक्ष.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ४० नगराध्यक्ष.
एकूण यश: महायुतीचे नगराध्यक्ष ७५ टक्क्यांहून अधिक आहेत.
“हा टीम भाजपचा विजय” – देवेंद्र फडणवीस
विजयाचा जल्लोष साजरा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला मिळाले नसेल, एवढे मोठे यश भाजपने मिळवले आहे. मी कोणत्याही सभेमध्ये कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. आम्ही केवळ विकासाची ‘ब्लू प्रिंट’ मांडली आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. हा विजय प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वातील टीम भाजपचा विजय आहे.”
विदर्भातील चित्र आणि मुनगंटीवारांची ‘खदखद’
नागपूर जिल्ह्यात भाजपला मिळालेल्या यशाचे श्रेय फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. विशेषतः कामठीमध्ये ३५ वर्षांनंतर पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपद आणि पक्षप्रवेशाबाबत व्यक्त केलेल्या नाराजीवर फडणवीस यांनी सूचक विधान केले. “सुधीरभाऊंना कुठे ताकद कमी पडली असेल, तर आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही त्यांना पूर्ण ताकद पुरवू. पक्षाची दारे सर्वांसाठी उघडी असली पाहिजेत, फक्त प्रवेश देणारी व्यक्ती योग्य आहे की नाही हे पाहावे लागेल,” असे फडणवीस म्हणाले. चंद्रपूर आणि गडचिरोलीत जिथे अपयश आले किंवा कमी मतांनी पराभव झाला, तिथल्या कारणांची मीमांसा केली जाईल आणि महापालिका निवडणुकीत ती कसर भरून काढली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.






