एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेतली (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हजारो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. उपोषणस्थळी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भेट दिली आहे.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर भेट दिली आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. अंगावर भगवं उपरण घेत इम्तियाज जलील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचबरोबर मराठा आरक्षणावर भूमिका देखील स्पष्ट केली आहे
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर देखील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी इम्तियाज जलील म्हणाले की, “जेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले सुरुवातीपासून मी आणि माझ्या पार्टीचे अध्यक्ष औवेसी यांनी लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाबाबत आवाज उठवला होता. जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती पूर्ण करायला पाहिजे,” अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतला आहे.
200 टक्के एमआयएम पक्षाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा
पुढे ते म्हणाले की, “इतके मोठे मोर्चे मराठा समाजाचे झाले. इतके मोठे आंदोलन सुरु आहे. सरकारमध्ये आत्तापर्यंत कोणतंही गांभीर्य दिसून येत नाही. याची मी निंदा करतो. लवकरात लवकर यावर तोडगा काढला पाहिजे, असे देखील मत एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्या भेटीबाबत ते म्हणाले की, मी मनोज जरांगे पाटील यांचा मोठा फॅन आहे. त्यांच्यासोबत आम्ही कायम आहोत. 200 टक्के एमआयएम पक्षाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे,” हे सांगण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला देखील इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “मी महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांना हे सांगून ठेवतो की जर त्यांनी जबरदस्ती करुन हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला तर जेवढ्या ताकदीने मराठा समाज रस्त्यावर उतरेल तेवढ्याच ताकदीने मुस्लीम समाज देखील खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरेल, असा इशारा इम्तियाज जलील यांनी महायुती सरकारला दिला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे की नाही? इतर राज्यांमध्ये महिनाभर आंदोलन चालतात. या सरकारला इतकी मराठा आंदोलनाची भीती का? की पाच दिवसांमध्ये हे नोटीस काढतात आणि घरी जा असं सांगतात. करु द्या ना शांततेच्या मार्गाने आंदोलन. देशात लोकशाही आहे इथे हुकूमशाही नाही,” असा आक्रमक पवित्रा इम्तियाज जलील यांनी घेतला आहे.