अजित पवार यांनी विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांचे टोमणे मारून अभिनंदन केले. (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर: राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. नागपूरमध्ये हे अधिवेशन सुरु झाले असून जोरदार रंगले आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये वादंग निर्माण झाला आहे. यामध्ये आता विधान परिषदेचे सभापतींची निवड करण्यात आली आहे. भाजपचे नेते राम शिंदे यांची निवड विधान परिषदेचे सभापती म्हणून करण्यात आली. यानंतर आता अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
मागील दोन वर्षापासून विधान परिषदेचे सभापती पद रिक्त होते. विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज राम शिंदेंकडे दिले. आज विधानसभा सभापतीपदी निवड झाल्यानंतर राम शिंदे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. अजित पवारांनी आपल्या खास शैलीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अजित पवार यांनी राम शिंदेंना शुभेच्छा देताना सांगितले की, “सभापती महोदय तुमच्या मतदारसंघात मी सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला. त्यामुळे विधानसभा निवडणूक हरल्याचेही आपण म्हणाला. पण, एका दृष्टीने ते योग्य झालं. जर विधानसभा निवडणुकीत निवडून आला असता देवेंद्रजींनी ठरवले असते तर मंत्रीही झाला असता. त्यामुळे गरीशला (महाजन) कदाचित थांबावे लागले असते. हे सर्व जाऊद्या, पण आज तुम्ही विधिमंडळात सर्वोच्च स्थानी आहात, असा खोचक टोला लगावून अजित पवार यांनी राम शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार व गिरीश महाजन यांच्यामध्ये देखील झालेल्या संभाषणामुळे सभागृहामध्ये एकच हशा पिकला. राम कदम यांच्यांशी बोलत असताना भाजप नेते गिरीश महाजन हे मध्येच बोलले. यावेळी अजित पवार म्हणाले की, “गिरीश आता तरी सुधर, कट होता होता वाचला आहे”, असे म्हटल्यानंतर संपूर्ण सभागृता हशा पिकला. अजित पवार यांच्या टोल्यामुळे सभागृहामध्ये सर्वजण हसू लागले.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोण आहेत राम शिंदे?
राम शिंदे हे कर्ज जामखेडमधील भाजप नेते आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये राम शिंदे यांच्याविरोधात शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी आव्हान दिले होते. रोहित पवार यांचा मागील टर्मपासून कर्जत जामखेड हा मतदारसंघ राहिलेला आहे. राम शिंदे यांनी 2009 मध्ये कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यानंतर 2014 मध्ये देखील ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देखील मिळवले होते. मात्र 2019 पासून रोहित पवार यांनी हा मतदारसंघ मिळवला. अजित पवार यांनी रोहित पवार यांचे प्रीतीसंगम स्मृतीस्थळावर दिलेल्या शुभेच्छांवरुन राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार यांनी मुद्दाम सभा न घेतल्याचा आरोप राम शिंदे यांनी केली आहे. आता ते विधान परिषदेचे आमदार असून आता राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती झाले आहेत.