पीसीएमसी विकासावरुन अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस समोर महेश लांडगेंना फटकारले आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये राजकारण तापले आहे. महायुतीमध्ये नाराजीचा सूर असून अनेक नेते हे नाराज आहेत. दरम्यान, पुण्यातील एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा शिलेदार असलेल्या आमदार महेश लांडगे यांनी त्यांचे तोंडभरुन कौतुक केले. त्यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासाचे श्रेय फडणवीसांना दिले आहे. यामुळे अजित पवार यांनी भर भाषणामध्ये महेश लांडगेंना फटकारले आहे.
पिंपरी चिंचवड पालिकेंतर्गत उद्घाटन आणि भूमिपूजनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस यांचे आमदार महेश लांडगे यांनी कौतुक केले. विकासकाला फडणवीसांमुळे सुरुवात झाली तसेच फडणवीस यांच्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला वेगळी ओळख मिळाली असे देखील महेश लांडगे म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख देखील केला नाही. यामुळे अजित पवार यांनी भाषणामध्ये महेश लांडगे यांचा समाचार घेतला.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
काय म्हणाले महेश लांडगे?
कार्यक्रमामध्ये भाषण देताना महेश लांडगे म्हणाले की, “पिंपरी चिंचवडची खरी ओळख ही 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून झाली. ते मुख्यमंत्री असताना पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला मंजूरी मिळाली. आता ते मुख्यमंत्री असताना त्याचे भूमिपूजन होत आहे. पिंपरी चिंचवडची ओळख ही पुण्याच्या खाली कुठेतरी लपली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हा विकास आणि ओळख मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचा वेगळा जिल्हा झाला तर त्याला शिवनेरी असं नाव द्यावं,” अशी इच्छा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.
आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांचे नाव न घेतल्यामुळे अजित पवारांनी बोलून दाखवले. कार्यक्रमातील भाषणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आता महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासाबाबत सांगितलं. त्यांना काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही. परंतू अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहित आहे. 1992 ला मी तुमचा खासदार झालो 92 ते 2017 कोणी पिंपरी-चिंचवड सुधरवलं. आज 25 वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष देऊन करत असतो. इथल्या अधिकाऱ्यांना विचारा या इमारतींमध्ये मी किती वेळा येतो किती वेळा चौकशी करतो आणि किती वेळा बसतो. शेवटी आपण महायुतीमध्ये आहोत त्यामुळे ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगले म्हणायला शिका. एवढाही कंजूषपणा दाखवू नका. मी दिलदार आहे ज्याने केलं त्याला त्याच क्रेडिट देत असतो,” असा टोला अजित पवार यांनी महेश लांडगे यांना लगावला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे ते म्हणाले, “कुणीतरी बातम्या उठवतो 26 जानेवारीला 21 जिल्हे जाहीर केले जाणार मात्र आता एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. आता जे चाललंय ते चांगलं चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल. परंतु उगीचच काहीही बातम्या करू नका,” असे देखील अजित पवार भर कार्यक्रमामध्ये म्हणाले आहेत.