वाल्मिक कराड याच्या आत्मसर्पणावर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया (फोटो - टीम नवराष्ट्र)
बीड : राज्यामध्ये बीजचे मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. यामुळे राजकारण ढवळून निघाले असून वातावरण तापले आहे. या प्रकरणातील मास्टर माईंड आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव पुढे आले होते. मागील अनेक दिवसांपासून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. आज अखेर वाल्मिकी कराड याने पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी ऑफिसमध्ये शरणागती घेतली. यानंतर आता त्याला अटक करण्याची जोरदार मागणी करणाऱ्या आणि या प्रकरणात धक्कादायक खुलासे करणाऱ्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीडमध्ये 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये आरोपींना अटक होत नसल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. 20 दिवसांनंतर देखील आरोपी अटक होत नसल्यामुळे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात होती. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन मास्टर माईंड असलेल्या वाल्मिक कराड याच्याबाबत अनेक खुलासे केले होते. तसेच वाल्मिक कराड याच्यामध्ये आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये संबंध असल्याचे देखील अनेक पुरावे अंजली दनामिया यांनी पुढे आणले होते. आता वाल्मिक कराड स्वतः सरेंडर झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारणी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
माध्यमांशी संवाद साधून वाल्मिक कराड आत्मसमर्पणावर अंजली दमानिया यांनी आपली भूमिका मांडली. तसेच संशय देखील व्यक्त केला आहे. वाल्मिक कराड यांना अटक करण्यात पोलिसांना आलेलं अपयश पाहाता पोलीस यंत्रणा व गृहमंत्रालय कॉम्प्रोमाईज्ड आहे का? असा सवाल अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. तसेच गुन्हेगार लोकांचे राजकीय लोकांशी संबंध असतील तर सामान्य लोकांना काय न्याय मिळणार आहे? असे देखील मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे.
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, आज त्यांना शेवटी अटक झाली आहे. यातून पुढे सगळी चौकशी व्हायला हवी. या गोष्टीला २० दिवस लागले हे शॉकिंग आहे. ते पुण्यात शरण आलेत. १७ तारखेला त्यांच्या मोबाईलवरून केलेला शेवटचा कॉल पुण्यातला होता. आज ३१ तारखेला ते पुण्यातच शरण आले असतील तर याचा अर्थ ते इतके दिवस पुण्यातच होते. आता आपली पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृहमंत्रालय कॉम्प्रोमाईज्ड आहे का? हा प्रश्न पडतोय”, असे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राविषयी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “हे सगळे राजकारणी एकमेकांच्या हातात हात घालून आहेत. त्यांचे सगळ्यांबरोबर संबंध होते. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, फडणवीस, अजित पवार या सगळ्यांबरोबर त्यांचे फोटो आहेत. जर गुन्हेगार लोकांचे राजकारण्यांशी संबंध असतील तर आपल्याला न्याय कधी मिळेल हा प्रश्न पडतो”, असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.