बाळा नांदगावकर यांनी उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित येण्यावर प्रतिक्रिया दिली (फोटो - टीम नवराष्ट्र)
BMC Election 2025 : ठाणे : राज्यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा सुरुवातीला अनिवार्य आणि त्यानंतर पर्यायी भाषा म्हणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याविरुद्ध ठाकरे बंधूंनी आवाज उठवला आणि मराठी माणसांचे दोन बंधूंचे एकत्र येण्याचे स्वप्न पूर्ण केले. दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले. वरळी डोम येथील मंचावर दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. याच पार्श्वभूमीवर आता मनसे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन्ही भावांच्या या एकत्रित येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावर भाष्य केले असून अनेक राजकीय विषयांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. बाळा नांदगावकर म्हणाले की, सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला नसता तर, पुढचे काही घडलेच नसते. हिंदी सक्ती केली तर, मराठी माणूस उठून पेटणारचं होता. यामध्ये तर सर्वांना राज ठाकरे यांचा स्वभाव माहितच आहे. ते मराठीविषयी कोणतीही तडजोड करत नाहीत, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर मुंबईमध्ये लवकरच महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे विरोधकांनी ठाकरे बंधूंचे एकत्रित येणे हे निवडणुकीसाठी असल्याचे म्हणत टीका केली आहे. याबाबत बाळा नांदगावकर म्हणाले की, “हिंदी सक्तीच्या विषयाला धरुन आम्ही पुढे निघालो आहोत, यात, महापालिका निवडणूकांचा कोणताही विषय नाही. महापालिका निवडणूका अजून खूप लांब आहेत. अद्याप निवडणूकांची तारिख नक्की झालेली नाही. परंतु, विरोधकांचे काम आहे, कोणतेही अर्थ काढायचे. त्याना कोणी रोखू शकत नाही. हे प्रेम टिकवायचं का नाही हे ठाकरे बंधूंनी ठरवावं,” असे वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले.
त्याचबरोबर मीरा भाईंदर रस्त्यावर झालेल्या आंदोलनाच्या पूर्वीच अविनाश जाधव यांना स्थानबद्ध करण्यात आले. याबाबत नांदगावकर म्हणाले की, “अविनाश जाधव हा आमचा उद्धवय्या माणूस आहे. त्याने मिरा भाईंदरमध्ये घेतलेला मोर्चा चुकीचा नव्हता तो योग्यच होता. त्या मोर्चाला रितसर परवानगी दिली असती तर गोंधळ झाला नसता आमचे कार्यकर्ते जे काही करत आहेत ते उत्तमप्रकारे करत आहेत. परंतु, कार्यकर्त्यांनी त्यांच्यात असलेली ऊर्जा कुठेही वाया घालवू नये, समाजाच्या हितासाठी जे जे काही करता येईल ते ते करा, अन्याय विरोध तिथे लाथ मारलीच पाहिजे. मात्र, ते करताना आपल्या पक्ष प्रमुखांना ही गोष्ट आवडेल का? ते पक्षाला फापदेशीर आहे का? याची काळजी घेतली पाहिजे,’ असेही ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बाळा नांदगावकर यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्या नेतृत्वाचे देखील कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “सेनापती लढवय्या असला ना तर, फौज पण लढवई असते..राज ठाकरे हे लढवय्ये सेनापती सारखे आहेत म्हणून त्यांची फौज म्हणजेच कार्यकर्ते ते देखील लढवय्ये आहेत, अशाप्रकारे कार्यकर्त्यांच कौतूक करत बाळा नांदगावकर यांनी महापालिका निवडणूकांसाठी लढायला सज्ज व्हा,” असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.