उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता (फोटो- ani)
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून बारामती परिसरासह तालुक्यातीलही महार वतनाच्या जमिनी अधिकाराचा गैरवापर करून लाटण्याचा आरोप भोजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांनी केला, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील महार वतनाची जमीन लाटली असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील. महार वतनाच्या जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण राज्यात गाजत असतानाच काळूराम चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले.
बारामती तालुक्यातील व राज्यभरातील महार वतनाच्या जमिनी बळकवल्याबाबत चौकशी करण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले. सदर पत्रात महार वतनाच्या जमिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या हस्तकांच्या नावे बऱ्याच प्रमाणात बळकावून समाजाला भूमिहीन केले आहे. यात अनेक महसूल अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कधीच जमीन घोटाळ्यात पार्थ पवार असं करणार नाही’ सुप्रिया सुळे यांच्या या वक्त्यावर विचारलेल्या प्रश्नावर चौधरी म्हणाले, सुळे यांनीही बारामती तालुक्यातील गोजुबावी गावातील महार वतनाची जमीन लाटली आहे. शारदानगर येथील शिक्षण संकुल ही महार वातनाच्या जमिनीवर उभारले आहेत, त्याचबरोबर मेडद येथील मागासवर्गीयांची जमीन ग्रामपंचायत चा ठराव करून अजित पवार यांनी खरेदी-विक्री संघाच्या पेट्रोल पंपासाठी हस्तांतरित करण्यास भाग पाडल्याचे चौधरी यांनी सांगितले.
बारामती तालुक्यातील अनेक महारवाटनाच्या जमिनी बेकायदा शासनाच्या नावावर करून त्या इतर कामासाठी हस्तांतरित करण्यास भाग पाडून बौद्ध समाजाला भूमिहीन करण्यास भाग पाडल्याचे चौधरी यांनी सांगितले. सोनगाव येथील एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीच्या नावावरील जमीन देखील १९९० नंतर अजित पवार यांनी त्यांच्या मुलाच्या नावे केल्याचा पुरावा देखील आपल्याजवळ असल्याचे सांगितले. या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी केली आहे. वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील चौधरी यांनी सांगितले.






