खरंच वेगळा पक्ष काढणार का? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'हो पक्ष निर्माण झालाच आहे...'
बीड : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये वादविवाद सुरु आहे. दरम्यान सध्या राजकीय वर्तुळामध्ये विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांची जोरदार चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांनी भुवया उंचावल्या आहेत. प्रीतम मुंडे यांच्या पुढील राजकीय प्रवासाबाबत प्रश्न विचारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.
लोकसभेमध्ये प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली होती. मात्र पंकजा मुंडे यांची बीड लोकसभा मतदारसंघामधून हार झाली. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर उमेदवारी देत त्यांचे राजकीय पुर्नवसन करण्यात आले. आता मात्र विधानसभा निवडणूकीपूर्वी प्रीतम मुंडे यांच्या राजकीय संधीबाबत काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत आमदार पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
यावेळी उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “प्रीतम मुंडेंच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत मी सध्या कुठलंही भाष्य करू शकत नाही. माझी भूमिका सर्वांना माहिती होती. प्रीतम मुंडे यांना माझ्यासाठी लोकसभेची जागा सोडावी लागली नाही. पक्षाने या जागेवरील उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा केली. त्यामुळे मला लोकसभेची निवडणूक लढवावी लागली. मात्र, आमच्यात यावर कोणतीही चर्चा नाही. पक्षाने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य असतो. त्यानुसार आम्ही पक्षाच्या आदेशाचं पालन केलं”, असे मत आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
आता युतीमध्ये मलाच जागा नाही
पुढे आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या की, “युतीत लढण्यासाठी आता मला कोणतीही जागा नाही, त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे. जेव्हा-जेव्हा लढायची वेळ येईल तेव्हा तेव्हा आम्ही लढू. जेव्हा पक्ष संघटनेसाठी काम करायची गरज असते तेव्हा आम्ही संघटना मजबूत करण्याचं काम करू. गेली पाच वर्षे मी संघटनेचं काम केलं आहे. आमच्यावर, आमच्या घरावर भाजपाचे संस्कार आहेत. वर्षानुवर्षे, पिढानपिढ्या आमच्यावर भाजपाचे संस्कार झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी त्या-त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात आणि आम्ही तेच करत आलेलो आहोत,” असे मत आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.