भाजपच्या नेत्यांनी अमित शाहांकडे डीसीएम एकनाथ शिंदेंची तक्रार केली आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
BMC Mayor : नवी दिल्ली : राज्यामध्ये नुकत्याच महापालिका निवडणूका पार पडल्या असून महायुतीला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले आहे. राज्यामध्ये भाजप पक्ष हा मोठा ठरला आहे. त्यामुळे आता महापालिकेपासून केंद्रापर्यंत भाजपचे अधिराज्य असल्याचे दिसून आले आहे. मुंबई महापालिकेवर देखील महायुतीचा झेंडा फडकला आहे. मात्र शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे निवडून आलेले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ही बाब आता दिल्ली दरबारी गेली असल्याचे समोर आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर मोठा डाव खेळला आहे. मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता तब्बल 25 वर्षानंतर गेली आहे. त्यामुळे मुंबई पालिकेवर शिवसेनेचे नाही तर भाजपचा महापौर बसेल असे स्पष्ट झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नगरसेवक हे निकाल लागल्यापासून हॉटेलमध्ये ठेवले आहेत. एकनाथ शिंदे यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांचा इतर पक्षातील नेत्यांसोबत संपर्क न होण्यासाठी हा मार्ग निवडला आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे अडीच वर्षांच्या महापौर पदाची मागणी केली आहे.
हे देखील वाचा : भाजपला का नकोय शिंदे गटाचा महापौर? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पलटू शकतो सगळा गेम
एकनाथ शिंदे यांनी एकप्रकारे मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरुन अडवणूक केल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपची केलेली राजकीय गोची दिल्लीपर्यंत गेली आहे. एकनाथ शिंदे यांची दिल्लीमध्ये तक्रार करण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जास्त जागा लढवल्यामुळे भाजपच्या स्ट्राइक रेटवर परिणाम झाला आहे. यामुळे मुंबईत भाजपचे मोठे नुकसान झाल्याची भावना भाजपच्या गोटातून व्यक्त केली जात आहे. याबाबत देखील दिल्लीमध्ये सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा : राजकीय पळवापळवी अन् सहकाऱ्यांवरचा अविश्वास! हॉटेल पॉलिटिक्सवरुन अमित ठाकरेंनी शिंदे गटाला फटकारलं
भाजप नेत्यांच्या मते, जागावाटपात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हट्ट धरून जास्त जागा घेतल्या, ज्याचा फटका संपूर्ण युतीला बसला. भाजपने १३५ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी ८९ जागांवर विजय मिळवून आपला दबदबा कायम राखला. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ९० जागा लढवल्या, मात्र त्यांना केवळ २९ जागांवर विजय मिळवता आला आहे. यामुळे भाजपच्या बहुमतावर परिणाम झाला आहे. भाजपने या ९० पैकी अधिक जागा लढवल्या असत्या, तर भाजप स्वबळावर १०० चा आकडा सहज पार करू शकला असता. त्यामुळे महायुतीला काठावरचे बहुमत मिळण्याऐवजी स्पष्ट आणि मोठे बहुमत मिळाले असते, असे गणित भाजप नेत्यांनी हायकमांडसमोर मांडले आहे.






