भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तेजस्वी घोसाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Tejasvi Ghosalkar joins BJP : मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाला राम राम ठोकत माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्ष सोडताना भावनिक पोस्ट केली आहे.यामध्ये त्यांनी पक्ष सोडताना दडपण येतं, पण काम होणं गरजेचं असतं असे लिहिले आहे. याबाबत माध्यमांनी प्रवीण दरेकर यांना प्रश्न केला. त्यावर प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, “स्वाभाविकपणे एखाद्या पक्षात अनेक वर्ष काम केल्यानंतर कुटुंबातून बाहेर पडताना जे दु:ख होतं, त्या संवेदना त्यांच्यात दिसल्या. ज्याला राजकारणात, समाजकारणात कार्य करण्याची, विकासाची भूक असते, समाजाप्रती काही करायचं असतं, ज्या विश्वास असतो इथे काम होऊ शकतं. देवाभाऊंवर मुंबई महाराष्ट्राचा विश्वास आहे. विकासासाठी भाजपासारख्या चांगल्या पक्षाला प्राधान्य आहे. मोदी साहेबांचा विकास, देवाभाऊंचा विकास यावर प्रभावित होऊन त्यांनी भाजपत प्रवेश केला आहे” असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : पतीची फेसबुक लाईव्हवर हत्या अन् बदलला राजकीय मार्ग; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश
पुढे ते म्हणाले की, “दादारमध्ये मराठी माणसाचे एकत्र येण्याचे बॅनर लागले आहेत, त्यावर प्रवीण दरेकर बोलले की, “हे सर्व ढोंग आहे, सोंग आहे. मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे खरेखुरे होते. महापालिकेतले कॉन्ट्रॅक्टर, ठेके बघा 25 वर्ष हे त्यांची तळी वाहत आहेत. आज देवाभाऊ, शिंदेसाहेब मराठी माणसासाठी काम करत आहेत” “आम्ही सर्व या मातीतलेच आहोत. भाजपचं मुंबईच नेतृत्व कोण करतय? अमित साटम, आशिष शेलार आणि मी कोण आहे?” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
हे देखील वाचा : 19 डिसेंबरला भाजपचा मराठी माणूस पंतप्रधान होणार; पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय भविष्यवाणीने उडाली खळबळ
कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?
तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह सुरु असताना अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक म्हणून तेजस्वी घोसाळकर यांनी पदभार स्वीकारला. यावेळीच त्या भाजप प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता.






