माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप पक्ष प्रवेश झाला (फोटो - सोशल मीडिया)
कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?
तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह सुरु असताना अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक म्हणून तेजस्वी घोसाळकर यांनी पदभार स्वीकारला. यावेळीच त्या भाजप प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) leader and former BMC Corporater Tejasvee Abhishek Ghosalkar joins BJP. She is the wife of UBT leader Abhishek Ghosalkar who was murdered in his office by one Maurice Bhai. Senior UBT leader and former MLA Vinod Ghosalkar is her… pic.twitter.com/vsQogzmGWQ — ANI (@ANI) December 15, 2025
पक्षप्रवेशापूर्वी घोसाळकर यांची भावनिक साद
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, आज आपल्याशी संवाद साधताना माझे मन प्रचंड उद्विग्न झाले आहे. आयुष्यात असा क्षण कधी येईल, आणि मला असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज मन जड आहे… शब्द अपुरे पडत आहेत… पण तरीही हा संवाद आवश्यक आहे. मी, तेजस्वी अभिषेक घोसाळकर, एक अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी, घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचे साधन नव्हते; सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकले. लोकांमध्ये राहणे, त्यांची कामे करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यातच मला खरा आनंद मिळत गेला.
हे देखील वाचा : ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टच सांगितले
सगळं काही छान सुरू असताना, अभिषेक व मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर-बोरिवलीतील आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्नं पाहत होतो. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं…
एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला. अभिषेकची निघृण हत्या झाली. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली. त्या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. दोन लहान लेकरं, मोडकळीस आलेलं मन, आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेला आहे.
पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना, आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाहताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे तेजस्वी घोसाळकर यांनी लिहिले आहे.
पुढे त्यांनी लिहिले आहे की, अशा वेळी मला केवळ पदाची नव्हे, तर मनापासून, निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे. मी कधीही असे म्हणणार नाही की, माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत. परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून, माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक १ असो वा इतर भाग तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मला एका वेगळ्या निर्णयाक पाहावे लागत आहे. तरीही एक गोष्ट मी ठामपणे सांगते, माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात आपण दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही, असे तेजस्वी घोसाळकर यांनी लिहिले आहे.
हे देखील वाचा : 19 डिसेंबरला भाजपचा मराठी माणूस पंतप्रधान होणार; पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय भविष्यवाणीने उडाली खळबळ
पुढे त्यांनी मतदारांना आवाहन करत लिहिले आहे की, मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन. आजही मी तुम्हाला शब्द देते- जात-धर्म-पक्ष-विचार न पाहता, जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल, तेव्हा कोणताही विचार न करता मी धावून येईन. अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरले आहे, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणे आणि माझ्या मुलांची व सहकाऱ्यांची काळजी घेणे.
आज आपणच माझा परिवार आहात. म्हणून बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणारा हा निर्णय आपण समजून घ्याल, अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. आज मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे, पण माझ्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या विश्वासावर कधीही ता जाऊ देणार नाही.
आपले प्रेम, आपली साथ आणि आपला आशीर्वाद मला कायम लाभो, हीच प्रार्थना, अशी अपेक्षा माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी व्यक्त केली.






