विधानसभा निवडणकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे राजकारण रंगले आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते सभा, बैठका आणि यात्रा करुन प्रचार करत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दोन्ही नेते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान, महायुतीचा घटक पक्ष असलेले अजित पवार गटाचे नेते जोरदार प्रचार करत आहेत. अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. बंडाचे राजकारण झाल्यानंतर शरद पवार गटावर अजित पवार गटाकडून अनेकदा टीका केली जाते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. पुण्यामध्ये एका जाहीर कार्यक्रमामध्ये चार दिवस सासूचे असतात पण चार दिवस सुनेचे पण असतात, असे म्हणत अजित पवार यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
पुण्यातील मावळ विधानसभेत विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेची ही असतात की नाही? का त्या सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतचं राहायचं? काळानुरूप बदल स्वीकारले जातात. वडील सत्तरी पार केल्यावर आपल्या डोळ्यात देखत मुलावर जबाबदारी सोपवतो, मात्र काहीजण ऐकतच नाहीत. एवढा हट्टीपणा कशाला?” असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर देखील अजित पवार यांनी आपले वेगळे होण्याचे कारण स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी टीका केली आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा! आज पंतप्रधान मोदी मुंबईत तर राहुल गांधी कोल्हापूरात
राज्यामध्ये लवकरच विधानसभा होणार असल्यामुळे तयारीमध्ये राहण्याचे देखील अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितले. ते म्हणाले की, “येत्या आठ ते दहा दिवसांत आचारसंहिता लागू होईल. 35 दिवसांनी मतदान होईल. आता समज-गैरसमज दूर करा, उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल तेव्हा हेवेदावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी इतरांनी मनापासून काम करा. आपल्याला सर्वांची गरज असते. उगीचं काहीही बोलून साध्य होत नसतं,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त करत निवडणूकीचे संकेत दिले आहेत.