जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी छगन भुजबळांची समता परिषदेची बैठक
गेल्या काही दिवसांपासून समता परिषदेची बैठक झालेली नव्हती. त्यामुळे आजच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. बैठकीनंतर बोलताना भुजबळ यांनी ‘ओबीसी आरक्षण संपले’ हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला. जात पडताळणी प्रक्रियेत काही चुका असल्यास त्याविरोधात लढा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जात जनगणना करण्याची मागणी आपण 2011 पासून करत असल्याचे सांगत सरकारने आता त्यासंदर्भात निर्णय घेतल्याचा दावा भुजबळ यांनी केला. महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील विविध जातींची स्थिती आणि त्यांच्या नोंदींबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘… तर मराठेही डाव टाकणार’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत भुजबळ यांनी तुलनेने सावध भूमिका घेतली. जरांगे यांची लढाई ओबीसींच्या विरोधात नसल्याचे सांगत या विषयावर सरकार निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गरज पडली तेव्हा आपण ओबीसी आणि माळी समाजाच्या प्रश्नांसाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राज्यभर फिरलो, असे सांगत संघर्षापासून आपण कधीही मागे हटलेलो नाही, असा संदेशही त्यांनी दिला.
दरम्यान, राज्यातील हवामानातील बदलांवरही भुजबळ यांनी भाष्य केले. काही भागांत अतिवृष्टी तर काही ठिकाणी पावसाचा अभाव जाणवत असल्याचे सांगत त्यांनी यामागे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचे मत व्यक्त केले.
‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
याशिवाय अन्न आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर त्यांनी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले. अंगणवाडीतील भोजनव्यवस्था आणि स्वच्छतेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांची समता परिषद बैठक आणि त्यानंतरची वक्तव्ये यामुळे ओबीसी-मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय केंद्रस्थानी आला आहे.






