Delayed medical treatment Due ambulance breakdown
धाराशिव : अपघातग्रस्त युवकाला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना १०८ रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्याने उपचारास विलंब होऊन रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका सेवेच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या यंत्रणेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!
धाराशिव-उजनी मार्गावरील बेंबळी येथे शनिवारी २४ ऑगस्ट रोजी दुचाकी आणि चारचाकीची भीषण धडक झाली. या अपघातात मुबिन आक्रम शेख (वय २२, रा. बेंबळी) हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची मदत घेण्यात आली. मात्र, उपचारासाठी रुग्णाला घेऊन जात असतानाच रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडल्याचा आरोप आहे.
अपघातातील गंभीर रुग्णांसाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत रुग्णवाहिकाच बंद पडल्यास ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या घटनेत रुग्णवाहिका बंद पडण्याचे नेमके कारण काय, ती रुग्णवाहिका सेवेत पाठवण्यापूर्वी तिची तांत्रिक तपासणी झाली होती का, चालकाने वाहनातील बिघाडाची पूर्वकल्पना दिली होती का आणि संबंधित अधिकाऱ्यांनी देखभाल-दुरुस्तीबाबत आवश्यक कार्यवाही केली होती का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
मुबिन याचे नुकतेच लग्न ठरले होते. त्याचा साखरपुडा झालेला होता. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका तरुणाचा जीव गमावल्यानंतर आता केवळ हळहळ व्यक्त करून भागणार नाही, तर रुग्णवाहिका व्यवस्थेतील प्रत्येक जबाबदार घटकाची भूमिका तपासण्याची मागणी होत आहे.
रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास केवळ चालकावर दोषारोप करून प्रकरण संपवू नये. वाहनाची फिटनेस स्थिती, नियमित सर्व्हिसिंग, ब्रेकडाउनपूर्वीची देखभाल नोंद, वाहन सेवेत ठेवण्याचा निर्णय, संबंधित कंत्राटदाराची देखभाल जबाबदारी तसेच १०८ सेवेच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची भूमिका तपासावी, अशी मागणी होत आहे.
संविधानातील अनुच्छेद २१ अंतर्गत जीवनाच्या अधिकारामध्ये आरोग्यसेवेचा प्रभावी प्रवेश हा महत्त्वाचा घटक मानला जातो. तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवेत निष्काळजीपणा झाला का, रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यास कोणामुळे अडथळा निर्माण झाला आणि त्या विलंबाचा मृत्यूशी काही संबंध आहे का, याचा वैद्यकीय व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास होणे आवश्यक आहे. दोष सिद्ध झाल्यास लागू असलेल्या फौजदारी कायद्यानुसार निष्काळजीपणाबाबत तसेच संबंधित प्रशासकीय नियमांनुसार जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.
आपत्कालीन रुग्णाला रुग्णालयापर्यंत सुरक्षित आणि कमीत कमी वेळेत पोहोचवणे ही रुग्णवाहिका सेवेची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, रुग्णाला घेऊन निघालेली रुग्णवाहिकाच वाटेत बंद पडत असेल तर या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. रुग्णांच्या जीवाशी संबंधित असलेल्या वाहनांची नियमित तपासणी आणि देखभाल केवळ कागदोपत्री होत नाही ना, याचीही तपासणी होणे गरजेचे आहे.
या घटनेची निष्पक्ष चौकशी करून रुग्णवाहिका बंद पडण्याचे तांत्रिक कारण, उपचारास झालेला विलंब आणि त्याचा रुग्णाच्या मृत्यूशी असलेला संबंध याची वैद्यकीय व प्रशासकीय चौकशी करावी. दोष आढळल्यास चालक, देखभाल करणारी यंत्रणा, संबंधित कंत्राटदार आणि पर्यवेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण आणि रुग्णवाहिका बिघाडामुळे उपचारास झालेला विलंब मृत्यूला कारणीभूत ठरला का, हे अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.






