तामिळनाडू काँग्रेस मंत्रिमंडळ: 59 वर्षांनंतर काँग्रेस तामिळनाडू मंत्रिमंडळात सामील (संग्रहित फोटो)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात आसाम, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या. याचे निकालही समोर आले आहेत. त्यातच आता जवळपास सहा दशकांत प्रथमच काँग्रेस तामिळनाडू मंत्रिमंडळाचा भाग बनणार आहे. पक्षाचे दोन आमदार गुरुवारी तामिळनाडू वेटी कळघम (टीव्हीके) प्रणित सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळात काँग्रेसचे आमदार एस. राजेश कुमार आणि पी. विश्वनाथन यांच्या समावेशाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजुरी दिली. त्यांच्या या मंजुरीनंतर ही घोषणा करण्यात आली. तामिळनाडूच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आणि टीव्हीके सरकारला पाठिंबा देणारी आघाडी मजबूत करण्याचे एक प्रमुख साधन म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.
सोशल मीडिया पोस्टद्वारे या घडामोडीला दुजोरा देताना आणि पक्षासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगताना, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले, “५९ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर काँग्रेस तामिळनाडू मंत्रिमंडळात सामील होत असल्याने हा आमच्यासाठी एक ऐतिहासिक प्रसंग आहे. त्यांनी दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या आणि कल्याणकारी शासन मॉडेल पुढे आणून तामिळनाडूच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते काम करतील”, असा विश्वास व्यक्त केला.
काँग्रेसचे विधानसभेत पाच आमदार
सध्या तामिळनाडू विधानसभेत काँग्रेसचे पाच आमदार आहेत आणि विधानसभा निवडणुकीनंतर टीव्हीके सरकारसाठी एक प्रमुख समर्थक शक्ती म्हणून काँग्रेस उदयास आली आहे. डावे पक्ष, व्हीसीके आणि आययूएमएल यांसारख्या इतर आघाडीतील भागीदारांसह काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला विधानसभेत सहजपणे बहुमताचा आकडा पार करता आला.
राजकीय निरीक्षक काँग्रेसच्या मंत्र्यांचा समावेश हा केवळ मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण मानत आहेत. राजकीय स्थिरता कायम ठेवत आघाडीचे व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी आणि मित्रपक्षांना अधिक प्रतिनिधित्व देण्यासाठी टीव्हीके नेतृत्वाने उचललेले हे एक हेतुपुरस्सर धोरणात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
शपथविधी नव्या पर्वाची सुरुवात करेल
गुरुवारचा शपथविधी सोहळा तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे, कारण जवळपास सहा दशकांच्या कालावधीनंतर काँग्रेस राज्यात मंत्रिपदावर परतत आहे.






