संग्रहित फोटो
पुणे/आकाश ढुमेपाटील : पुणे शहरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवांमुळे गेल्या काही दिवसांत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरातील काही पेट्रोल पंप बंद असल्याचे दिसल्याने इंधनटंचाईबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, शहरात इंधनाचा पुरेसा पुरवठा आणि साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन पेट्रोल डिलर्स असोसिएशनने केले आहे.
पुणे शहरातील काही पेट्रोल पंप तात्पुरते बंद असल्याचे दिसताच समाजमाध्यमे आणि नागरिकांमध्ये इंधन संपत असल्याची चर्चा वेगाने पसरली. त्यामुळे अनेकांनी घाईघाईने पेट्रोल पंपांकडे धाव घेतल्याने काही ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. परंतु, हे पंप बंद राहण्यामागे दरवाढ किंवा खरीखुरी इंधनटंचाई कारणीभूत नसून नागरिकांमधील घबराट हेच मुख्य कारण आहे. “इंधन संपेल की काय?” या भीतीने वाहनचालक मोठ्या प्रमाणावर अनावश्यक साठा करून ठेवत आहेत. यामुळे इंधनाची मागणी अचानक वाढली असून, नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे पंपांवरील साठा नेहमीपेक्षा लवकर संपत आहे. याच कारणास्तव काही पंप तात्पुरते बंद ठेवावे लागत असून, तेल कंपन्यांकडून नियमित पुरवठा सुरू असल्याने ही परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, असे पंपचालकांनी स्पष्ट केले आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात सुमारे १००० पेट्रोल पंप कार्यरत असून, यामध्ये पुणे शहरात सुमारे २००, पिंपरी-चिंचवड शहरात २५० आणि उर्वरित जिल्ह्यात ५५० पंपांचा समावेश आहे. या सर्व भागांत इंधनाचा पुरेसा साठा असताना नागरिकांनी अनावश्यक घबराट निर्माण करू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवून इंधन साठवण्याची घाई करू नये, असे आवाहन पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी केले आहे. अफवांमुळे अचानक वाढणारी गर्दी आणि अतिरिक्त मागणी यामुळेच अनावश्यक तणाव निर्माण होत असून, नागरिकांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे.






