'निवडणूक आयोग सरकारच्या हातातली कठपुतली'; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची टीका
मुंबई : भाजप निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एक बॉम्ब टाकून भाजप व निवडणूक आयोग लोकशाहीचा खून कसा करत आहेत, हे देशाला दाखवून दिले. हरियाणात मतचोरी कशी केली याचे पुरावे देऊन निवडणूक आयोगाला उघडे पाडले. पण ‘निर्लज्जम सदा सुखी’ या उक्तीप्रमाणे निवडणूक आयोगाच्या कामात काहीच सुधारणा होत नाही. निवडणूक आयोग सरकारच्या हातातली कठपुतली बनले आहे, असे आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध मुद्यांवर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी पुरावे सादर करूनही निवडणूक आयोग जागा होत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, झोपी गेलेल्याला जागे करणे सोपे आहे, पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करणे अवघड आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हरियाणा पॅटर्न वापरून भाजपने चोरीचे सरकार बनवले”.
दरम्यान, महाराष्ट्रात अवघ्या सहा महिन्यात ४७ लाख मतदार वाढले तर मतदानानंतर रात्रीच्या अंधारात जवळपास ८ टक्के मतदान वाढल्याचे दाखवले. आता त्याच सदोष मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरल्या जात आहेत”, असेही सपकाळ म्हणाले.
निवडणूक आयोग उदासीन
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दुबार मतदारांची नावे यादीतून वगळण्याबाबत निवडणूक आयोग उदासीन असल्याचा आरोप केला आहे. आयोगाने ही कृती तात्काळ करावी, असे सांगत त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात हजारो नावे दुबार असल्याचे निदर्शनास आणून दिले.
सपकाळांवर पोलिसांची पाळत?
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. सपकाळ वास्तव्याला असलेल्या नाना चौकातील सर्वोदय आश्रमात पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवून असल्याचा आरोप केला जातोय. यावरुन हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
हेदेखील वाचा : Bihar Election Voting Day 2025 : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार रिंगणात






