उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्रित विजयी सभा नवा टीझर आऊट (फोटो सौजन्य - एक्स्)
Vijayi Sabha Teaser 2025 : मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सध्या ठाकरे बंधू हे चर्चेत आले आहेत. मराठी अस्मितेसाठी आणि हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित आले आहेत. दोन्ही नेते एकत्रित मोर्चा काढणार होते. मात्र शासन आदेश रद्द केल्यानंतर दोन्ही नेत्यांची एकत्रित विजयी सभा पार पडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूंच्या या एकत्रित सभेची चर्चा आहे. तसेच यावरुन राजकारण देखील रंगले आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून या विजयी मेळावाचा नवा टीझर आऊट करण्यात आला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रितपणे सभा पार पडणार आहे. येत्या 5 जुलै रोजी ही सभा होणार असून एन.एस.सी.आय डोम येथे ही विजयी सभा होणार आहे. ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या चर्चा मागील अनेक वर्षांपासून होत्या. अखेर मराठी भाषेच्या लढ्यासाठी दोन्ही भाऊ एकत्रित येत आहेत. मात्र हा कोणत्याही प्रकारचा राजकीय मेळावा नसल्याचे दोन्ही पक्षांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. राजकीय झेंड्याशिवाय आणि राजकीय अजेंडाशिवाय या विजयी मेळावा फक्त मराठी भाषेसाठी काढला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी ठाकरे बंधूंचा हा मुंबईतील मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्या (दि.05) हा मेळावा होणार आहे. त्यापूर्वी ठाकरे गटाकडून मराठी माणसांना सहभागी होण्याचे जोरदार आवाहन केले जात आहे. विजयी मेळाव्याचा टीझर आऊट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रबोधकार ठाकरे यांच्यापासून बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ज्या ज्या वेळी ठाकरेंनी महाराष्ट्राला साद घातली आहे त्या त्या वेळी मराठी माणूस एकवटला…लढला…आणि भिडला. हिंदी सक्ती आडून मराठीच्या पाठीत वार करण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. तेव्हा महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले आणि जिंकले. आता ठाकरेंनी पुन्हा एकदा हाक दिलीये महाराष्ट्राला. विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी. वाजत गाजत आणि गुलाल उधळत या…, असे आवाहन ठाकरे गटाने टीझरच्या माध्यमातून मराठी जनतेला केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिलीय महाराष्ट्राला…
विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी!वाजत-गाजत, गुलाल उधळत या!
दिनांक – ५ जुलै २०२५
स्थळ – एन.एस.सी.आय. डोम, वरळी, मुंबई
वेळ – सकाळी ११.०० वाजता pic.twitter.com/gDNJuJv7mb— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 4, 2025