Nagpur Municipal Elections : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र
नागपूर : आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस यांच्यात परस्पर संमतीने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेत्यांकडून अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे हे राजकीय समीकरण बिघडले. काँग्रेसने थेट भाजपला फायदा पोहोचविण्यासाठी रात्री 3 वाजता युती तोडल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शप) कडून करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) नेत्यांच्या म्हणण्यानुसार, जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा पूर्ण झाली होती. कोणत्या प्रभागात कोणता पक्ष निवडणूक लढवणार याबाबत स्पष्टता होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात काँग्रेस नेतृत्वाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री ३ वाजता काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना अंतिम निश्चितीसाठी कॉल केला. तेव्हा त्यांनी आघाडी शक्य नसल्याचे उत्तर दिले. इकडे आघाडीत राहून १५ जागा लढविण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती.
ऐन वेळेवर त्यांची स्थिती खराब झाली. तरीही देशमुख यांनी रातोरात यंत्रणा हालवत ७९ उमेदवार मैदानात उतरविण्याची तयारी केली. उलट, राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आलेल्या जागांवर कोणतीही पूर्वसूचना न देता काँग्रेसने स्वतःच्या उमेदवारांना ‘बी फॉर्म’ दिल्याने विश्वासघात झाल्याची भावना शरद पवारांच्या शिलेदारांमध्ये निर्माण झाली.
मतभेद चव्हाट्यावर
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाच्यावतीने तब्बल ७९ उमेदवारांना तिकीट जाहीर करण्यात आले. यामुळे उपराजधानीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत.
आघाडी कमजोर करण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसवर आरोप करताना म्हटले की, ही भूमिका भाजपच्या फायद्यासाठीच घेतली गेली आहे. आघाडी कमजोर करून मतांचे विभाजन घडवून आणण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दुसरीकडे, काँग्रेसकडून या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या घडामोडींमुळे नागपूर महानगरपालिका निवडणूक अधिकच चुरशीची होणार, हे निश्चित.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : पुण्यासह संभाजीनगरमध्येही भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली; दोन्ही पक्ष आमनेसामने






