सध्या राजकारणाची नव्हे; एकसंघ राहण्याची वेळ - हर्षवर्धन सपकाळ (फोटो - सोशल मीडिया)
कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य तोडून, मोडून दाखवण्यात आले आहे. यामध्ये एका मोठ्या वर्गाकडून राजकारण केले जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे. सध्याची वेळ ही राजकारणाची नसून सर्वांनी एकसंघ राहण्याची आहे. त्यामुळे कोणीही याबाबत राजकारण करू नये. सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण काँग्रेस पक्ष, पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ता हा सैन्य दल व सरकार बरोबर राहण्याची भूमिका आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सध्या देशावर संकटाचे सावट आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी भारतीय सैन्य व सरकारच्या बरोबर राहिले पाहिजे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र वेगळे राज्य आहेत. परंतु, सध्या महाराष्ट्र धर्म धोक्यात आहे. विचार, आचार, व्यवहार आणि उच्चार कसा ठेवावा, याची आठवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर नतमस्तक होताना झाली. त्याचसोबत राज्यकर्त्यांनी आपली वाणी, आपले वक्तव्य कशी ठेवली पाहिजे, याचाही आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना घालून दिला होता.
काँग्रेस पक्षाने पुढे जात असताना महाराष्ट्र धर्माची सभ्यता, संस्कृती, राजकारणाची दिशा कशी असावी, याचा संकल्प केला आहे. दुसरीकडे ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला’ हा आपला इतिहास आहे. त्याचे स्मरणही आज येथे झाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तुत्वाला साक्षी ठेवून प्रत्येक भारतीय नागरिकांनी सैन्य दलाच्या पाठीशी राहिले पाहिजे, असे मतही यांनी यावेळी व्यक्त केले.