देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट; 15 मिनिटे चर्चा, राजकीय वर्तुळाच चर्चंना उधाण
Devendra Fadnavis meets Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाची धडाडती तोफ अशी ओळख असणार खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. संजय राऊत यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत तशी माहिती दिली होती. त्यानंतन आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांच्या चिरंजीवाच्या विवाह सोहळ्यात संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूसह केली. काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आजाराचे निदान झाले होते. या आजारावर उपचार करण्यासाठी संजय राऊतांनी काही दिवस सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे, संजय राऊतांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत असून आता ते काही कार्यक्रमांना हजेरी लावतानाही दिसत आहेत. दरम्यान आज संजय राऊतांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले होते. तसेच लवकरच ते राजकारणात पुन्हा सक्रीय होतील, असंही त्यांनी सांगितलं होते. त्यानंतर अलीकडे संजय राऊत पुन्हा एकदा सोशल मीडियावरून राजकीय घडामोडींवर भाष्य करत असल्याचे दिसून आले. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे हेदेखील आज संजय राऊतांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
फडणवीस–राऊत भेटीचे फोटो व्हायरल; १५ मिनिटांची गप्पा
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यातील भेट विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. फडणवीस आणि राऊत यांच्यात जवळपास १५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी आशिष शेलार हेही दोघांच्या शेजारी उपस्थित असल्याचे दिसून आले.
या सोहळ्यास उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली की नाही, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. फडणवीस आणि राऊत यांच्या अनपेक्षित संवादामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले असून, या भेटीचे भविष्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतील याची उत्सुकता निर्माण झाली आहे.






