'एका आरोपीला पोलिसांनी वाचवलंय का?' विलास घुले हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप
बीड जिल्ह्यातील केज येथे घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. घुले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, या प्रकरणातील एका संशयित आरोपीला अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला.
मुंडे म्हणाले की, पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असली तरी आणखी एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला जात असून त्याच्याविरोधात कारवाई का होत नाही, याचे उत्तर मिळायला हवे. त्यांनी असा आरोप केला की, संबंधित व्यक्तीला बाहेर ठेवून पुरावे नष्ट करण्याची संधी दिली जात आहे.
धनंजय मुंडे यांनी सांगितले की, या प्रकरणात कोणत्याही जाती-पातीचा किंवा वैयक्तिक वैराचा मुद्दा नाही. मात्र कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत. एका आरोपीसाठी वेगळा आणि दुसऱ्यासाठी वेगळा न्याय असू नये, असे ते म्हणाले.
‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार
बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
केजमधील हॉटेलमध्ये झालेल्या वादादरम्यान मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास आता आयपीएस अधिकारी वेंकटराम यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचे नावही चर्चेत आले आहे. मृताच्या नातेवाईकांनी त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. मात्र सौरभ सोनवणे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, आवश्यक असल्यास आपल्या कॉल रेकॉर्डचीही चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे.






