भगवानबाबा भक्ती गडावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Dhananjay and Pankaja Munde’s Dasara Melava Live 2024 : बीड : राज्यामध्ये दसरा मेळाव्याचा उत्साह आहे. तर राजकीय वर्तुळामध्ये दसरा मेळावा सुरु आहेत. राज्यामध्ये आज अनेक प्रमुख नेत्यांनी दसरा मेळावा आजोति केला आहे. मराठवाड्यामध्ये राजकीय वातावरण तापले आहे. बीडमध्ये भगवानबाबा भक्त गडावर मुंडे परिवाराचा पारंपरिक दसरा मेळावा पार पडत आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून ही दसरा मेळाव्याची परंपरा सुरु आहे. त्यानंतर आता भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे या वारसा चालवत आहेत. मागील सात वर्षांपासून भगवान बाबा भक्ती गडावर पंकजा मुंडे दसरा मेळावा घेत आहेत. यंदाचे वैशिष्ट्य असे की, पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे हे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आले आहेत. धनंजय व पंकजा मुंडे हे भावंड तब्बल 12 वर्षे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मुंडेंच्या या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे कोणावर लक्ष्य करणार? तसेच आरक्षणावर देखील काय बोलणार याची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मुंडे परिवाराकडून कोणाला संधी दिली जाते या सर्व बाबींवर दसरा मेळाव्यामध्ये भाष्य करण्याची शक्य आहे.
12 Oct 2024 03:13 PM (IST)
पंकजा मुंडे कुणाला घाबरत नाही. अंधारात भेटत नाही. पंकजा मुंडे फक्त एकाच गोष्टीला घाबरते. या मैदानात माझं भाषण ऐकायला लोकं येणार नाही त्या दिवसाला घाबरते. भगवान बाबांना प्रार्थना करते असा दिवस कधीच येऊ देऊ नको. हा काही शासकीय कार्यक्रम नाही किंवा लाभार्थी संमेलन नाही. आता मतदान केल्याशिवाय ऊसतोडीला जाऊ नका. हे वचन द्या.
12 Oct 2024 03:03 PM (IST)
माझ्या दसरा मेळाव्याला लोक आपसूक येतात. या मेळाव्याला 18 पगड जातीचे लोक आलेत. आज सभेला नाशिकहून, नगरहून आले का, बुलढाण्याहून आले आहेत. गंगाखेड, जिंतूर परभणी नांदेड, अकोला अमरावती पुणे पिंपरी चिंचवड कुठून कुठून लोक आले आहेत. सगळ्या राज्यभरातून बांधव आलेत. मी दरवर्षी तुम्हाला साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली आहे. तुम्ही मला जिंकवलं, मला इज्जत दिली. माझा पराभव झाल्यावर सर्वात अधिक इज्जत दिली. आता मी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे, असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. परळीतून आम्ही धनु भाऊला तर निवडून देणारच आहोत. पण आता सगळीकडे मी येणार आहे. आमच्या लोकांना त्रास दिल्यास त्याचा हिसाब घेतल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे.
12 Oct 2024 02:56 PM (IST)
उपस्थितांशी ओळख करुन देताना पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांचा उल्लेख माझी लाडकी बहीण म्हणून केला. ती माझा जीव की प्राण आहे असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी त्यांचा मुलाची ओळख करुन दिली. व्यासपीठावरील युवकाती ओळख करुन देत त्याला जवळ घेत पंकजा म्हणाल्या, हा गोरा गोरा मुलगा कोण आहे. हा माझ्यापेक्षा फार उंच. फार गोड आहे. हा माझा मुलगा आर्यमन. तो भगवान बाबाच्या दर्शनाला आला. तुम्हाला वाटत असेल मला आर्यमन जास्त प्रिय आहे. पण मी त्याला सांगितले, तुझ्या पेक्षा माझी जनता मला प्रिय आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
12 Oct 2024 02:51 PM (IST)
दसरा मेळाव्यामध्ये बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी त्यांचा वारसा मला जो दिला, त्यांना त्यांचा मृत्यू दिसत होता, असं मला वाटतं. कारण त्यांनी भगवान गडावरुन शेवटचं वाक्य म्हटलं ते असं होतं की, मला यावेळी गडावरुन दिल्ली नाही, मुंबई नाही तर मला गडावरुन पंकजा मुंडे दिसत आहे. त्यांनी मला त्यातून जो संदेश दिला आहे तो संदेश मी खरा करुन दाखवला. मला जीवनामध्ये काही दुसरं उभारता आलं नसेल पण मी भगवान भक्तीगड निर्माण केला.
12 Oct 2024 02:46 PM (IST)
दसरा मेळाव्यामध्ये बोलताना धनंजय मुंडे यांनी एक शेरा म्हटला आहे. या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. पण तरीही सांगतो. आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत. 'तुम लाख कोशिस करो हमे हरानेकी हम जब जब बिखरेंगे दुगुनी रफ्तारसे निखरेंगे,' असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
तर पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या भाषणाची सुरुवात शेर म्हणत केली. त्या म्हणाल्या की, 'इंसान की जाती, फिर भी जीना मुश्कील जीते हैं, जाती भेद और पिछडेपण का, नित्य जेहेर जो पिते हैं, उन पिछडोंने अपनाया मुझको..मैं उनकी रोझी रोटी हू,मैं गौपीनाथ मुंडे की बेटी हूॅं,' असे म्हणत पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात केली.
12 Oct 2024 02:35 PM (IST)
दसरा मेळाव्यामध्ये सर्व जाती धर्माची लोकं असतात असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांचे पोस्टर घेऊन नाचणाऱ्या मुस्लीम समर्थकांचं पंकजा मुंडे यांनी कौतुक केले आहे. सलाम वालेकुम म्हणत पंकजा मुंडे यांनी मुस्लीम बांधवांचं स्वागत केलं.
12 Oct 2024 02:31 PM (IST)
पुढे धनंजय मुंडे म्हणाले की, "कोणी म्हणत असेल की निकालावरुन, पण माझ्या दृष्टीने निवडणूक आणि राजकारण याच्या पलिकडे हा विचारांचा, हा भक्तीचा आणि हा शक्तीचा, गोपीनाथ मुंडे यांच्या परंपरेचा आणि तो वारसा चालवत असलेल्या पंकजा मुंडे हा दसरा मेळावा आहे. आपल्या सगळ्यांचं जीवन संघर्षातून गेलं आहे. गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा संघर्ष कधी स्वतःसाठी नव्हता. हा मायबाप जनतेसाठी होता. हीच शिकवण दिली आहे. गोपीनाथ मुंडे यांची संघर्षाची लढाई आता पंकजाताईंनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. येथून पुढच्या संघर्षामध्ये सुद्धा आपल्या सर्वांना पंकजा ताईंच्या मागे एक राहून उभे राहायचं आहे. कोणत्याच संतांनी महापुरुषांनी जातीसाठी काम केलेलं नाही. ते राज्य कोणत्या एका जातीसाठी नाही तर आठरा पगड जातींसाठी होतं," असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
12 Oct 2024 02:15 PM (IST)
भगवान बाबा भक्ती गडावर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहिले आहे. राज्यभरातून या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. धनंजय मुंडे म्हणाले की, मी आज एवढं भारावून गेलो आहे. 12 वर्षांच्या तपानंतर दसरा मेळाव्याला आलो आहे. या पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. माझ्या या सर्व पिढीला ही लक्षात आली पाहिजे. भगवान बाबा यांनी सोनं लुटून दसरा साजरा केला याची परंपरा आपलं दैवत गोपीनाथ मुडेंनी शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवली. त्यांच्यानंतर ही पवित्र परंपरा माझ्या भगिनी पंकजाताई चालवतात. मोठा भाऊ म्हणू अभिमान आहे. आणि 12 वर्षांचा प्रारब्ध मी भोगला आणि त्यांनीही भोगला. पण आता हा प्रारब्ध आता संपला आहे, अशा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या.
12 Oct 2024 02:10 PM (IST)
बीडमध्ये होत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थिती लावली आहे. त्यांच्या या उपस्थितीमुळे मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये कलगीतुरा रंगेल असे म्हटले जात होते. भगवान बाबा भक्तीगडावरुन लक्ष्मण हाके यांनी संवाद साधला आहे. लक्ष्मण हाके दसरा मेळाव्यामध्ये म्हणाले की, महाराष्ट्रातील 18 पगड जातींच्या या बहुजनांचे स्वागत करतो. भगवानबाबा गडावरील दसरा मेळावा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा सुंदर असा मिलाफ आहे. दसऱ्याला या गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मनामध्ये एक शक्ती निर्माण करण्यासाठी हा विचार मंच या महाराष्ट्राला दिला. बहुजनांचा आवाज बनण्याचं काम मुंडे यांनी केलं. त्यांचे वारस असलेले हे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आहेत. राजकारण हे होत असतं. निवडणूका येत असतात जात असताता. हार जीत होत असते. पण पंकजा मुंडे या पराभूत झाल्या तेव्हा काहींनी जीवन संपवले. गोपीनाथ मुंडे यांनी तरुणांच्या मनामध्ये बिरुद पेरले. अशा गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा मुंडे यांच्या पाठीशी आपल्या उभे राहायचे आहे. असं म्हणत ओबीसी नेते यांनी गोपीनाथ मुंडे यांचे पोस्टर दाखवले. तसेच भगवा झेंडा फिरवला.
12 Oct 2024 01:56 PM (IST)
माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी भगवानबाबा भक्ती गडावरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थितांना शांती राखण्याची विनंती केली. दसरा मेळाव्याला संबोधित करताना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, "आज सावरगाव घाटचे नाव हे जगाच्या नकाशावर आलं कारण भगवानबाबांनी दिलेली सद्बुद्धी आहे. मुंडे साहेबांचा स्वाभिमान आणि पंकजाताईंच्या नशिबी आलेला संघर्ष आणि त्यांची असणारी संवेदनशीतलता या सगळ्यामुळे भगवानबाबा भक्ती गडावर हा दसरा मेळावा पार पडत आहे. येथे पार पडणारा मेळावा हा मुंडे साहेबांच्या लेकीचा..बहुजनांच्या एकीचा आहे. आणि म्हणून आजच्या दसरा मेळाव्याचं वेगळं महत्त्व आहे. हा कोणत्याही पक्षाचा राजकीय कार्यक्रम नाही. हा स्वयंस्फुर्तीने हजारो लाखो समर्थक उपस्थित आहेत. एवढे समर्थक ज्यांच्या पाठीशी आहेत त्यांना दोन मिनिटांत समर्थकांना हाती धरुन सत्ता गाठणं सहज शक्य होतं. पण आपलं ध्येय सत्ता नसून सर्वसामान्य जनतेची सेवा आहे. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडेंनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला," अशा भावना प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
12 Oct 2024 01:41 PM (IST)
भगवानबाबा गडावर पंकजा मुंडे या सातव्यांदा सलग दसरा मेळावा घेत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मुंडे समर्थकांची अलोट गर्दी भगवानबाबा गडावर लोटली आहे. यंदाचे दसरा मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दसरा मेळाव्याला एकत्रित आले आहेत. यावेळी पंकजा मुंडे यांनी ओपन जीपमधून गडावर एन्ट्री घेतली. लाखो समर्थकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा गडावर पोहोचली. पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांच्या बहीण प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या. हातामध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पोस्टर घेत पंकजा मुंडे यांनी समर्थकांमधून मंचाकडे प्रवास केला. यावेळी या यात्रेमध्ये समर्थकांनी झेंडे मिरवत फुलांच्या पाकळ्याची उधळण केली. 'आमचं सरकार आमची ताई' असे म्हणत समर्थकांमधून पंकजा मुंडे या मंचावर गेल्या आहेत.