'देशात मुदतपूर्व निवडणुका लागणार'; काँग्रेसच्या 'या' नेत्याचं विधान (संग्रहित फोटो)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. त्यातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले आहेत. यानंतर महाराष्ट्रातही पडसाद उमटले आहेत. असे असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशात मुदतपूर्व निवडणुका लागणार असल्याचे मोठं विधान केलं आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ‘वोट चोर, गद्दी छोड’ या काँग्रेसच्या कॅम्पेनची बुधवारी कामठी येथून सुरवात झाली. यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे. तसेच, महाराष्ट्रात मतचोरीच्या प्रयोगाची सुरवात विधानसभा क्षेत्रातून झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
याशिवाय, देशभरात मुदतपूर्व निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. 75 वर्ष झाल्यानंतर खुर्ची खाली करा, असे रेशीमबागच्या बाबाने दिल्लीच्या बाबाला सांगितले आहे, असा दावा सपकाळ यांनी यावेळी सभेत केला. पुन्हा एकदा देशात फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे सरकार येणार आहे. मत चोरांच्या गळ्यात घंटा बांधायला आमचा ढाण्यावाघ राहुल गांधी लढत आहेत, असे म्हणत त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
कामठीच्या आमदाराचा करायचाय बंदोबस्त
भाजपाला मतचोरी वाट कामठीच्या आमदाराने दाखवली. एका-एका मोबाईलवरून 500 मतदारांची नोंदणी केली. एका झोपडीत 200 मतदार मतदारांनी नावे घुसवली आहेत. त्यामुळे पहिला बंदोबस्त कामठीच्या आमदाराचा करायचा आहे. आता हातावर हात ठेवून बसलो तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका
काही दिवसांपूर्वीच, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग फक्त तुमची मते चोरत नाहीयेत, हे तुमचे राशन, तुमच्या जमिनी चोरतील आणि अदानी अंबानींना देतील. ज्या शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच शक्ती या संविधानाची हत्या करण्यचाा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही त्यांना संविधानाची हत्या करू देणार नाही, अशा शब्दांत खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे.