Eknath Shinde News: एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही
Eknath Shinde News: शिवसेना शिंदे गटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ९ फेब्रुवारी रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दुःखाच्या छायेत असताना आपण कोणताही सोहळा, समारंभ किंवा जल्लोष करणे उचित नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
“अजित दादांच्या जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. मी वैयक्तिकरित्या माझा एक जवळचा सहकारी आणि मित्र गमावला आहे. ही अपरिमित हानी कधीही भरून न येणारी आहे,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पवार कुटुंबाच्या दुःखात आपण पूर्णपणे सहभागी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना कळकळीचे आवाहन केले आहे. ” आपल्या वाढदिवसानिमित्त कुणीही पुष्पगुच्छ, भेटीवस्तू आणू नयेत किंवा शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नयेत. तसेच वाढदिवसानिमित्त कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये,” अशी विनंतीही त्यांनी केली आहे.






