एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन्हीही नेते दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत (फोटो - टीम नवराष्ट्र)
Maharashtra Political News : नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. महायुतीचे सत्ताधारी नेते हे त्यांच्या वादग्रस्त आणि बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. काही नेत्यांच्या नावे अवैध धंदे असल्याचे समोर येत आहे. तर काही नेते थेट माराहाण करताना दिसत आहेत. यामुळे वातावरण तापले असून विरोधक देखील आक्रमक भूमिका घेत आहेत. दरम्यान, राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष हे तयारीला लागले आहे. नेत्यांच्या दिल्ली वारी वाढल्या असून राज्याच्या राजकीय गुंता हा दिल्ली दरबारी सोडवला जाणार असल्याची शक्यता आहे.
महायुतीमधील खास करुन एकनाथ शिंदे यांचाय शिवसेनेमधील नेते हे चर्चेत आले आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणींमध्ये देखील वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा दिल्लीला गेले असल्याचे दिसून आले आहे. एकनाथ शिंदे यांची या एकाच आठवड्यातील ही दुसरी दिल्ली वारी आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मनातील नाराजीचा सूर समोर येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून त्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण बैठका होणार आहे. उद्धव ठाकरे यांची इंडिया आघाडीसोबत देखील बैठक होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांची राहुल गांधींसोबत बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्रित राहुल गांधी यांच्या बंगल्यावर भेट घेणार असून रात्रीचे जेवण घेणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे ६ ऑगस्ट रोजी म्हणजे दिल्लीत पोहोचतील. त्यानंतर ते संजय राऊत यांच्या निवासस्थानी जातील. ६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेतील. त्यानंतर ते ६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा सर्व पक्षाच्या खासदारांची बैठक घेतील. ७ ऑगस्ट रोजी खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर ते सकाळी ११ वाजता संसद भवनातील पक्ष कार्यालयात जातील. दुपारी ते राजकीय बैठक घेतील. ७ ऑगस्ट रोजी ते राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनर आणि इंडिया अलायन्स बैठकीला उपस्थित राहतील. यावेळी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.