धाराशिव जिल्हा खूप अडचणीत तरीही प्रशासनामध्ये गांभीर्य नाही; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका (फोटो - एक्स)
धाराशिव : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक नेतेमंडळींकडून नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा सुरु आहे. असे असताना आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पिके वाहून गेली आहेत. पशूंचे नुकसान झाले असून, नागरिक आणि शेतकरी अडचणीत आहेत. सध्याचा कठीण कालखंड महाराष्ट्रासाठी आहे. सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा आहे’. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावर थोरात म्हणाले, ‘केंद्र सरकारची मदत त्यांनी घ्यावी. अत्यंत भरून मदत मिळायला हवी. महाराष्ट्र सर्वात जास्त GST उत्पन्न देतो. मात्र, त्याचा परतावा नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि पंतप्रधानांनी मदत करायला हवी’, असे ते म्हणाले.
हेदेखील वाचा : Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू; कशी आहे महायुतीची रणनीती?
तसेच आमच्या सर्वांचे डोळे या मदतीकडे लागले असून, लवकरात लवकर मदत करायला हवी. पंचनामा हा विषय राहिलेला नाही, विषय सरसकटचा आहे. देवेंद्र फडणवीस यांचे वजन आहे की नाही हे मदत येण्यावर अवलंबून आहे. वजन काय असेल ते टाकलं पाहिजे. वेळप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे हट्ट करायला हवा. राज्य सरकारकडून पैशांना कमी पडणार नाही हे पूर्वीपासून त्यांचे वाक्य आहे. याआधी ते खूप वेळा बोलले आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांची इच्छा दाखवायला हवी, असेही थोरात यांनी सांगितले.
धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सवर थोरात म्हणाले…
धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण यांचा डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावरही थोरात यांनी समाचार घेतला. धाराशिव जिल्हा खूप अडचणीत आहे. येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळी मुख्य भूमिका ही जिल्हाधिकाऱ्यांची आहे. मात्र, प्रशासनामध्ये गांभीर्य नाही. गांभीर्य तेव्हाच येते जेव्हा सरकारमध्ये गांभीर्य असेल, सरकारमध्येचं गांभीर्य दिसत नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारलाही टोला लगावला.