कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी नथूराम गोडसेंचे नाव घेत बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Balasaheb Thorat Death threat : संगमनेर : वारकरी सांप्रदायातील हरीनाम सप्ताहामध्ये कीर्तनकारांनी राजकीय भाष्य केल्यामुळे संगमनेरमध्ये वाद निर्माण झाला आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी कीर्तन देताना कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. या कार्यक्रमानंतर भंडारे यांनी व्हिडिओ व्हायरल करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव घेत, “आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल” असा थेट इशारा त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे. कॉंग्रेस सह राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संगमनेरचे राजकारण तापले आहे. कीर्तनकारांनी बाळासाहेब थोरात यांना इशारा दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी कीर्तनामध्ये कोणत्या विषयावर बोलायचे हा सर्वस्वी आमचा निर्णय आहे. याचे स्वातंत्र्य आम्हाला संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांनी दिले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. यापुढे संगमनेरमध्ये कीर्तनकारांवर हल्ला झाला तर यामध्ये सहआरोपी म्हणून बाळासाहेब थोरात यांचे नाव घेतले पाहिजे, असे देखील कीर्तनकार संग्राम भंडारे म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत मत मांडले आहे. ते म्हणाले की, “संगमनेरमधील हरिनाम सप्ताहामध्ये जे काही घडलं ते सर्व संगमनेरकरांनी समजून घेतले पाहिजे. हरिनामा सप्ताह हा वारकरी सांप्रदायाचे विचार मांडण्याचे ते एक व्यासपीठ आहे. त्याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. त्याची काही पथ्ये देखील आहेत. पथ्ये हेच आहे की, अशा व्यक्तींनी राजकीय भाष्य करू नये. कारण तिथे बंधूभाव असणे गरजेचे असते. कारण कोणाला ठेस लागेल असे वाक्य कोणी करता कामा नये. मात्र दुर्दैवाने हे पाळले जात नाही. राज्यघटनेत कुठेही कोणाला ठेच लागेल अशी वक्तव्ये नाहीत,” अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
मी महात्मा गांधी नाही, पण…
पुढे बाळासाहेब थोरात म्हणाले की, “घुलेवाडीत त्या दिवशी नकारात्मक कीर्तन सुरू असल्याने त्याला विरोध करण्यात आला. त्यानंतर खोट्या केसेस करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. काही कीर्तनकार अशा प्रकारची उचकावणारी वक्तव्ये करतात. पोलिस दबावाखाली काम करत असल्याचेही दिसते. मी महात्मा गांधी नाही, पण जर त्यांच्या सारखे बलिदान देण्याची वेळ आली, तर लोकशाहीसाठी ते बलिदान मिळण्यात मला आनंदच आहे.” असे देखील मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणावर जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी लिहिले आहे की, “आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’ या धमकीचा नेमका अर्थ काय होतो? महाराष्ट्रातील सुसंस्कृत व संयमी नेते अशी ओळख असलेल्या बाळासाहेब थोरात यांना अशा प्रकारची धमकी देण्यात आलेली आहे. वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे भूषण आहे. या संप्रदायाने जगाच्या कल्याणाची शिकवण मानवजातीला दिलेली आहे. मात्र, आज या संप्रदायामध्ये काही समाजविघातक वृत्ती घुसखोरी करून त्याचा राजकीय कारणांसाठी वापर करीत आहेत. याबाबत वारकरी संप्रदायाने सजग राहायला हवे, पण त्यासोबतच अशा प्रकारे धमकी देणाऱ्या समाजकंटकांवर सरकारने कडक कायदेशीर कारवाई करायला हवी,” असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.