फोटो सौजन्य: iStock
आज देवकौठे गावात १५० पेक्षा अधिक पोल्ट्री फार्म कार्यरत असून, येथून दररोज सुमारे साडे सहा लाख अंड्यांची विक्रमी निर्यात केली जाते. यामधून गावाची दैनंदिन उलाढाल सुमारे ६५ ते ७० लाख रुपये इतकी होत असून, या व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. परिणामी, शेतीला पूरक म्हणून सुरू झालेला पोल्ट्री व्यवसाय आज गावातील अनेक कुटुंबांसाठी मुख्य उत्पन्नाचे साधन ठरला आहे.
गेल्या २५ वर्षांपासून पोल्ट्री व्यवसायात कार्यरत असलेले जगदंबा उद्योग समूहाचे संचालक राजेंद्र कहांडळ यांनी सांगितले की, एक दिवसांचे पिल्लू सुमारे १०५ दिवसांत पूर्ण विकसित होते आणि त्यानंतर अंडी उत्पादनास सुरुवात होते. एका कोंबडीचे सरासरी आयुष्यमान ७०० दिवसांचे असते. सुरुवातीला पाच हजार पक्ष्यांपासून सुरू केलेल्या पोल्ट्री फार्मचा विस्तार आज ४० हजार पक्ष्यांपर्यंत झाला असून, त्यात प्रामुख्याने लिअर जातीच्या कोंबड्यांचा समावेश आहे. या व्यवसायामुळे आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
संगमनेर तालुक्याच्या उत्तर भागातील तळेगाव पट्ट्यातील देवकौठे गावाला पूर्वी सातत्याने दुष्काळी परिसर म्हणून ओळखले जात होते. मात्र, सुमारे १५ वर्षांपूर्वी युवकांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्म सुरू केल्याने या गावाचे चित्रच बदलले. तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विविध विकासकामांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्यास हातभार लागला.
गावाच्या परिसरातील स्वच्छ वातावरण आणि कोरडे हवामान कोंबड्यांच्या संगोपनासाठी पोषक ठरल्याने, आज गावातील २५० पैकी १५० हून अधिक कुटुंबे कमी-अधिक प्रमाणात पोल्ट्री व्यवसायात कार्यरत आहेत.
ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडिताकडून ५ हजारांची लाच मागणी, समाजकल्याणचा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात
देवकौठे गावातील पोल्ट्री फार्ममध्ये १ हजार ते १ लाख पक्ष्यांची क्षमता आहे. येथून दररोज सुमारे साडे सहा लाख अंडी गुजरातमधील सूरत, तसेच मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यात निर्यात केली जातात. अंड्यांच्या साठवणुकीसाठी गावात ५ लाख अंड्यांची क्षमता असलेले एक शीतगृह तसेच २ ते ७ हजार अंड्यांची क्षमता असलेली १५ वेअरहाऊस उपलब्ध आहेत.
स्थानिक मजूर उपलब्ध नसल्याने मध्यप्रदेशातील सुमारे ४०० मजुरांना या गावात रोजगार देण्यात आला आहे. तसेच, प्रत्येक पोल्ट्रीधारकाकडे स्वतःची फीड मिल असून, त्यापैकी ७५ मिल ३० अश्वशक्ती आणि ५ मिल ५० अश्वशक्ती क्षमतेच्या आहेत. पक्ष्यांसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन काही वेळा टँकरद्वारे करावे लागते.
यावर्षी गुजरात-धुळे सीमेवरील नवापूर तसेच दक्षिण भारतातील काही हॅचरीज कंपन्यांनी रोगनियंत्रणासाठी सुमारे तीन महिने उत्पादन बंद ठेवल्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. परिणामी, पक्ष्यांची उपलब्धता कमी झाल्याने ब्रॉयलर अंड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. सध्या अंडी साडेसहा रुपये प्रति नग या घाऊक दराने विक्री केली जात आहेत.






