स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर; महापालिकेसह जिल्हा परिषद निवडणुका... (फोटो - iStock)
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिका निवडणुकांसह काही निवडणुका रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली. निवडणुकांचा एकूण कालावधी बघता आता या निवडणुका तीन टण्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. आयोग राज्यातील २९ महानगरपालिका, २४६ नगरपालिका व नगरपंचायती, ३२ पंचायत समित्या आणि ४२ जिल्हा परिषदांसाठी निवडणुका घेणार आहे. आयोग लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यानुसार, पहिला टप्पा नगरपालिका आणि नगरपरिषदांसाठी आणि दुसरा जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी असेल. शेवटचा तिसरा टप्पा मुंबईसह सर्व २९ महापालिकांसाठी निवडणुकांसाठी असणार आहे.
दरम्यान, वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या तारखा स्पष्ट होतील. न्यायालयाचा आदेश तंतोतंत पाळला गेल्यास आयोग जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्वकाही पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु
आगामी निवडणुका पाहता, सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मोर्च, निषेध आणि आरोप-प्रत्यारोपांचे खेळ सुरू आहेत. मतचोरी, ईव्हीएम फेरफार आणि मतदार यादी दुरुस्ती यांसारखे मुद्दे मोठ्या प्रमाणात आहेत. राज्यातील दोन्ही आघाडीतील घटकपक्ष महायुती आणि महाविकास आघाडी आपापले डावपेच आखण्यात व्यस्त आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र?
सध्याच्या राजकीय चित्रानुसार दोन्ही आघाडीतील सर्व पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत आहेत. काही ठिकाणी दोन्ही आघाडी एकत्र असतील, भाजप आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा त्यांचा इरादा आधीच जाहीर केला आहे.
मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ठाकरे एकत्र
मुंबई निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले आहेत. भाजपने बूथ स्तरावरीत तयारी पूर्ण केली आहे, तर काँग्रेस देखील आपली उपस्थिती दाखवत आहे. सर्वजण फक्त निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची प्रतिक्षा करीत आहे.
हिवाळी अधिवेशनानंतर शक्यता
हिवाळी अधिवेशनानंतर लगेचच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, असे म्हटले जात आहे. निवडणुका दोन टप्यात होण्याची शक्यता देखील आहे. पहिला टप्पा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आणि नंतर दुसरा टप्पा शेवटच्या आठवड्यात होऊ शकतो.
फेब्रुवारीत बोर्ड परीक्षा
राज्यात फेब्रुवारीमध्ये बोर्ड परीक्षा सुरू होणार असल्याने, आयोग त्यापूर्वी निवडणुका घेईल, संपूर्ण निवडणूक वेळापत्रकाचे नियोजन करण्यासाठी आयोग न्यायालयाकडून आणखी एक किंवा दोन महिने मुदतवाढ मागू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हेदेखील वाचा : Local Body Election: मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्ही पुरावे दिले…; महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट






