काँग्रेसला खिंडार! 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होत असून काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे. सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचे दोन माजी महापौर, एक माजी उपमहापौर आणि किमान १२ माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, सांगलीचे माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, चंद्रकांत हुलवान यांच्यासह काही माजी नगरसेवक नव्याने इच्छुक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
या संदर्भात बोलताना किशोर जामदार यांनी सांगितले की, “केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षाने निधी देऊन महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेतला आहे.” आणखी १६ ते १७ माजी नगरसेवक पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सोमवारी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्ष प्रवेश सोहळा पार होणार हे निश्चित होते.
दरम्यान, मिरज शहरातील काँग्रेसचे मुख्य नेतृत्व राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने, काँग्रेस पक्ष मोठ्या खिंडार पाडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, या पक्षाच्या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलतील असे मानले जात आहे.






