"कवडीमोल विकण्यापेक्षा स्वाभिमानी आंबेडकरी बाण्याने मतदान करा...", अंजली आंबेडकर यांचे आवाहन
सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार शनिवारी २० डिसेंबर रोजी येथील प्रभाग क्रमांक १४ बसाठी मतदान होणार आहे. या प्रभागातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शीतल दादाराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ येथील भीमनगर क्रांतिचौकात बुधवारी १७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता जाहीर सभा झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
मागील जवळपास तीस वर्षांपासून येथून आंबेडकरी विचारांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. हे आजपर्यंतचे आपले अपयश आहे. यास मतदार म्हणून आणि आंबेडकरी विचारांचे वारसदार म्हणून आपण जबाबदार नाहीत काय. असा प्रश्न उपस्थित करून त्या म्हणाल्या की प्रस्थापित पक्षातील उमेदवार किंवा नगरसेवक ठेकेदारीच्या माध्यमातून मोठे घबाड कमावतात. त्या संपत्तीतून ते मतदारांना भाजीपल्यासारखे खरेदी करतात. अवैध मार्गाने स्वतःची संपत्ती वाढवतात.
परिणामी आपल्या वार्डाचा विकास खुंटतो. स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या सुविधांसह रस्ते आणि दिवाबत्ती या मूलभूत सोईपासून आपण वंचित राहतो. नगरपालिकेतील आपल्या हक्काचा निधी खर्च करण्या ऐवजी प्रस्थापित पक्ष आणि त्यांचे हस्तक उमेदवार स्वतःच्या खिशातून निधी खर्च केल्याचा आव आणत असतात. मात्र आपले हक्क आणि अधिकार याची जपणूक करण्यासाठी आपला, आपल्या विचारांचा उमेदवार पालिकेत असणे गरजेचे आहे. तसे झाल्यास शहरातील प्रत्येक भागातील आपल्या विचारांच्या लोकांची कामे सहज आणि गतीने होतील. असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंचावर वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुरेखा वाघमारे, मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रनबागुल, जिल्हाध्यक्ष अनुराधा लोखंडे आणि अन्य उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला समता सैनिक दलाने आंबेडकरांना सलामी दिली. चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी शीतल चव्हाण आपली भूमिका मांडताना, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेते सुजाता आंबेडकर यांची सभा माझ्या प्रचारानिमित्त या अगोदर झाली होती. आता राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांचीही सभा होत असून तमाम बहुजनांचे दैवत असलेल्या आंबेडकरी घराण्यातील नेत्यांची सभा माझ्या प्रचारासाठी होत असून हे मी माझे भाग्य समजतो. असे सांगितले. यावेळी शीतल चव्हाण यांच्या आंबेडकरी घरण्याबद्दल असलेल्या कृताज्ञेच्या भावना अनावर झाल्या. त्यांचा गळा दाटून आला. डोळे पाणावले. यावेळी समोरचा जनसमुदायही भावुक झाला होता.






