विधानसभा निवडणूकीपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारी केली जात आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. तसेच जागावाटपावरुन बोलणी सुरु असून चर्चा देखील केल्या जात आहेत. दरम्यान, मविआच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जेष्ठ नेते शरद पवार व उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी महायुतीमधील भष्ट्राचारांची यादी असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये कॉंग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला. नाना पटोले म्हणाले की, “महायुती सरकारच्या भष्ट्राचाराची अनेक उदाहरण देता येतील. काल या भागामध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. सत्ता पक्षातील नेते सुद्धा सुरक्षित नाहीत. आधी आम्ही विचारत करत होतो की राज्यात महिला अन् शाळेत जाणाऱ्या 5 वर्षांच्या मुली सुरक्षित नाही. तर या घटनेमुळे राज्यात सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा सुरक्षित नाहीत, हे समोर आले आहे. तर मग जनतेची काय स्थिती असेल. यांचा आता राजीनामा नाही तर यांना जनताच सत्तेवरुन उतरवेल. फक्त स्वतः राजकारण करणं हाच राज्य सरकारचा मानस आहे. राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना सुद्धा असंविधानिक पद्धतीने पदावर बसवले आहे. यामुळे पोलिसांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा मतभेद झाले आहेत. त्यांच्यामुळे राज्यातील सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत,” अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “या सरकारचं म्हणजे गद्दारीचा पंचनामा आहे. यामध्ये गद्दारी फक्त राष्ट्रवादी किंवा शिवसेना पक्षासोबत झालेली नाही. तर ही गद्दारी महाराष्ट्रासोबत झाली आहे. जणू काही महाराष्ट्र हा मोदी-शहा गुलामांची वसाहत झाली आहे, अशा पद्धतीने हे सरकार चालवत आहेत. हे सरकार आता घालवलं पाहिजे. सर्व बाबतीत बोजबारा उडालेला आहे. दोन पोलीस कमिशनर असलेले मुंबई हे शहर आहे. पण कारभाराचा काय? महिला, राजकारणी, सत्ताधारी पक्षातील नेते असुरक्षित आहेत तर सामान्य जनेतेचे काय? जेवढी गद्दारांना, त्यांच्या समर्थकांना आणि कुटुंबाला जेवढी सुरक्षा देण्यात आली आहे. ती काढून जनतेसाठी वापरा. मला वाटतं ह्यांच्या घरी धुणी भांडी करणाऱ्यांना पण सुरक्षा दिली असेल. ही पोलिसांची सुरक्षा जनतेच्या रक्षणासाठी आहेत. हे सरकार आपल्या अंगाला काही लागू देत नाही. कारभाराची जबाबदारी घेत नाहीत,” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.