महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार (File Photo)
नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत एकमत होत आहे. ही निवडणूक सोबत लढण्यावर चर्चेची एक फेरी पूर्ण झाली असून, काँग्रेसने यावर सकारात्मकता दाखवली. राष्ट्रवादी शरद पवार गट व ठाकरे सेनेकडूनही तसे संकेत मिळाले. त्यामुळे तूर्तास महायुतीत जागावाटपावरून खलबत होत नसताना महाविकास आघाडीतील एकीमुळे निवडणुकीत रंगत येईल, असे चित्र आहे.
मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षाचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नागपूरसाठी निरीक्षक रणजीत कांबळे तसेच नागपूरचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्यात चर्चा झाली. यात मित्र पक्षांसोबत भक्कम आघाडी, निवडणूक रणनीती आणि सक्षम उमेदवारांची निवड या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल व सकारात्मक चर्चा केली गेली. या बैठकीनंतर आमदार विकास ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी नागपूर महानगरपालिका निवडणूक सोबत लढेल. यासंदर्भातील चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाली. सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गटाकडून प्रस्ताव येईल. त्यानंतर चर्चा अंतिम करण्यात येईल.
हेदेखील वाचा : Ahilyanagar : सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू ; वंचितकडून महाविकास आघाडीला अल्टिमेटम
तसेच शिवसेना ठाकरे गटातर्फे संपर्कप्रमुख सतीश हरडे, पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे व जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांच्यात रेशीमबाग येथील कार्यालयात सायंकाळी चर्चा झाली. यावेळी हरडे यांनी चर्चा झाल्याबद्दल दुजोरा देत २ दिवसात पुढील चर्चा होणार असल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनीही लवकरच जागेचा प्रस्ताव देऊन चर्चा होईल, असे सांगितले.
काँग्रेसच्या १९, २० रोजी मुलाखती
काँग्रेसकडे जवळपास हजारांवर इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले. या सर्व उमेदवारांच्या मुलाखती १९ व २० डिसेंबरला घेण्यात येणार आहे. देवडिया भवन येथे या मुलाखती होतील, असे तूर्तास सांगण्यात आले. २३ ते ३० डिसेबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करावयाचे असल्याने त्यापूर्वी मुलाखती आटोपून पक्षाने उमेदवार निश्चित करण्यावर भर दिला.
हेदेखील वाचा : Thackeray Brothers Alliance : निवडणूक जाहीर झाली पण ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं






