शरद पवारांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग (Photo Credit- X)
मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा ‘वर्षा’ (Varsha) निवासस्थानी भेट घेतली. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या भेटीचा तपशील गुलदस्त्यात असला तरी, १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एमसीए निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची जोरदार चर्चा आहे.
आव्हाड आणि फडणवीस यांच्या भेटीपूर्वी, एमसीएच्या राजकारणातील दोन मोठे गट असलेल्या शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात वानखेडे स्टेडियमवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते.
यावेळी त्यांची भाजप नेते आशिष शेलार यांच्याशी २० मिनिटे चर्चा झाली. मागील एमसीए निवडणुकीत पवार आणि शेलार गट एकत्र आले होते, त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या चर्चेनंतर पवार, आव्हाड, अजिंक्य नाईक आणि मिलिंद नार्वेकर यांची गरवारे क्लब येथे पुन्हा दीर्घ बैठक पार पडली.
गरवारे क्लबमधील बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्यासोबत एकाच गाडीतून निघाले आणि रात्री १० वाजता थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचले. या भेटीत एमसीए निवडणुकीतील संभाव्य उमेदवार आणि राजकीय डावपेचांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटींच्या सत्रामुळे आगामी एमसीए निवडणुकीसाठी जोरदार तयारी आणि राजकीय डावपेच सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
Maharashtra Politics: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारकडून दिलासा योजनांची घोषणा






