"मुख्यमंत्र्यांना दोन पदे झेपत नसतील तर राजीनामा...", यशोमती ठाकूर यांची फडणवीसांवर टीका!
मुंबई : सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण आरोग्य आणि पोलीस प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली असून, त्यामध्ये त्यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. याचप्रकरणावरून आता काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे.
“फडणवीस यांनी दोन दोन पदे स्वत:कडे ठेवली आहेत, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना दोन दोन पदे झेपत नसतील, तर त्यांनी राजीनामा द्यावा,” अशी घणाघाती टिका काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. फलटणमध्ये पोलिसांच्या बलात्कार आणि छळामुळे डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याच्या घटनेवर ठाकूर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
फलटण (जि. सातारा) येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे या तरुणीने शुक्रवारी आत्महत्या केल्याचे समोर आले. या तरुणीने हातावर सुसाईट नोट लिहून त्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने डॉक्टर महिलेवर चार वेळा बलात्कार केला. तर पोलीस प्रशांत बनकर याने सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचे म्हटले होते. तसेच तरुणीच्या नातेवाईकांनी डॉ. संपदा मुंडे यांना पोस्ट मॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी पोलिस दबाव टाकत होते. पोलिसांच्या छळाबद्दल डॉ. संपदा मुंडे यांनी यापुर्वी तक्रार केली होती. परंतू पोलिसांनी त्याची दखल न घेतल्यामुळे अखरे पोलिसांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत.
फलटण मधील डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या मनाला चटका लावणारी आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जर जबाबदारी सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या !#फलटण#डॉ_संपदा_मुंडे_आत्महत्या #JusticeForSampada#phaltan #doctor #suicide #Police… pic.twitter.com/XuYWWQDyae — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) October 24, 2025
या घटनेनंतर यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रीया दिली, त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘कायद्याचे रक्षकच भक्षक झाले आहेत. फडणवीस साहेब तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि गृहमंत्री देखील आहात. तुम्ही एकतर मुख्यमंत्री रहा, किंवा गृहमंत्री रहा, दोन्ही पदे तुम्हाला पाहिजेत, पण तुम्ही सांभाळू शकत नाही. तुमचा दबदबा नाही आहे, काय चालले आहे राज्यात ? हे जर असे होत राहिले महाराष्ट्रात तर काय होईल. रक्षकच जर भक्षक होत आहेत. पोलिसांना तुमचा दरारा वाटत नाही, तर मग राजीनामा द्या. महिला अत्याचाराच्या घटना राज्यात सातत्याने होत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष घाला आणि महाराष्ट्राचे रक्षण करा. अन्यथा राजीनामा द्या’ अशी टिका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारी आणि महिला अत्याचारांच्या घटनांवरुन यशोमती ठाकूर यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून फडणवीस यांचे अपयश आहे. त्यामुळे जर कायदा आणि सुव्यस्था राखणे आणि पोलिसांवर जरब ठेवता येत नसेल आणि दोन दोन पदे सांभाळणे जमत नसेल तर फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.






