आमदार रोहित पवार यांचा पोलिसांवर संताप करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Rohit Pawar Angry on Police : मुंबई : महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधानसभेच्या आवारामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये मारामारी झाली. या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणावरुन आमदार रोहित पवार हे देखील आक्रमक झाले आहेत. रोहित पवार यांचा पोलिसांना दम भरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशीरा पर्यंत पडळकर त्यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे आक्रमक भूमिका घेतली. यावेळी आमदार रोहित पवार यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले. रोहित पवार यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित पवार हे वर्दीमधील पोलिसांना दम भरताना दिसत आहेत. यावेळी रोहित पवार म्हणत आहेत की आवाज खाली…आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला…शहाणपणा करु नका, बोलता येत नसेल तर बोलायचं नाही. कळलं का? व्हा बाहेर तुम्ही.. हातवारे करु नका, असा आक्रमक पवित्रा आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे. त्यांचा व्हिडिओमध्ये संतापलेला अवतार दिसून येत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडियावर रोहित पवार यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओवर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, आम्ही चार तास झालं नितीन देशमुखला शोधत आहे. आम्ही जेव्हा आझाद मैदान पोलीस स्टेशनला गेलो होतो, ते जे कोणी एपीआय होते त्यांना काय चाललं आहे हे देखील त्यांना कळत नव्हतं. ते झोपेत होते की वेगळे काही होते हे नाही सांगता येणार, असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले, आम्ही त्यांना विचारत होतो की नितीन देशमुख कुठे आहे? तर ते बोलतं होते कसं, काय अन् माहिती नाही. आम्हाला अतिरिक्त एसपी आम्हाला काय सांगत आहे की तो तिथे आहे. तर आम्ही तिथे गेलो. आम्ही काय दमदाटी केली का? खालच्या भाषेमध्ये शिव्या दिल्या का? दोन दिवसांपूर्वी एक आमदार एका अधिकाऱ्याच्या बाबतीत आई बहीण काढली. खालच्या भाषेमध्ये शिव्या दिल्या. त्याबाबत तुम्हाला काही दिसत नाही का? आमच्या कार्यकर्त्यांच्या टेन्शनमध्ये माझा जरा आवाज वाढवला तर त्याला दमदाटी म्हणतात. जर सामान्य लोकांसाठी, गरिबासाठी, कार्यकर्त्यांसाठी जर पोलीस प्रशासन सहकार्य करत नसेल तर हा आवाज आणि ही स्टाईल आम्ही शेवटपर्यंत ठेवू असा आक्रमक पवित्रा आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे.