'भाजपसोबत राज ठाकरे भेटत असतील तर...'; रोहित पवारांचं मोठं विधान
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. असे असताना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबत विधान केलं. ‘भाजपसोबत राज ठाकरे भेटत असतील तर सर्वसामान्यांचे वातावरण हे राज ठाकरे यांच्या बाजूने झालं होतं. या वातावरणाचा फायदा मनसेने भाजपसोबत वाटाघाटीचा केला का? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला येईल’, असे त्यांनी म्हटले.
नागपुरात रोहित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘बच्चू कडूंनी जो मुद्दा घेतलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांची भूमिका योग्य आहे. सामान्य लोकांसाठी बच्चू कडू लढत आहेत. आम्ही सर्व लोक बच्चू कडूंना भेटण्यासाठी तिथे जात आहोत आणि त्यांना पाठिंबा देत आहोत’. तसेच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत त्यांनी म्हटले की, ‘जयंत पाटील हे कार्यक्रमाच्या दिवशी भावनिक झाले होते. योग्य जबाबदारी ते पाळत आहेत. भावनेच्या भरात त्यांनी वक्तव्य केले. सुप्रिया सुळे, देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे हे सर्व मिळून पक्षाचा भावी विचार करतील.
तसेच प्रदेशाध्यक्षांची जबाबदारी मला मिळावी यासाठी माझी इच्छा नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही जबाबदारी मिळावी. सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे बसून एक चांगला विचार करतील व एक सामान्य कुटुंबातील सामान्य माणसाला अनेक वर्ष ही पक्षाच्या हितासाठी काम करत आहे, अशा व्यक्तीला संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सर्वसामान्य माणसाच्या मनात सुद्धा…
मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर रोहित पवार म्हणाले, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वातावरण जेव्हा निर्माण झालं होतं, त्यावेळी सर्वसामान्य माणसाच्या मनात सुद्धा आत्मीयतेची भावना निर्माण झाली होती. ठाकरे कुटुंबात मोठ्या प्रमाणात कटूता होती. भाजपसोबत राज ठाकरे भेटत असतील तर सर्वसामान्यांचे वातावरण हे राज ठाकरे यांच्या बाजूने झालं होतं. या वातावरणाचा फायदा मनसेने भाजपसोबत वाटाघाटीचा केला का? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला येईल. राज ठाकरेंचं नाव कुठेतरी खराब होऊ शकतं. परिवारात आमची कुठलीही कटूता नाही. पवार परिवार हा व्यापक विचार करून काम करत असतो, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.