भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदेंना शिवसेनेत मिळाली 'ही' मोठी जबाबदारी; महापालिका निवडणुकीत फायदा होणार?
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच सत्तेवर असलेल्या शिवसेनेत स्थानिक व जिल्हा पातळीवर पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला बेबनाव व पदाधिकाऱ्यांची गटबाजी दिसून आली. ही परिस्थिती लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष शिस्त तसेच संघटन बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुहास कांदे यांची जिल्हा संघटकपदी नेमणूक केली आहे.
सुहास कांदे यांच्या नेमणूकीमुळे पक्षांतर्गत गटबाजीला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे निष्ठावंतांचे म्हणणे आहे. सध्या जिल्ह्याची जबाबदारी सचिव भाऊसाहेब चौधरी, राम रेपाळे, उपनेते व जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, जिल्हा संपर्कपदी विजय करंजकर, सहसंपर्क प्रमुखपदी राजू लवटे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यातील प्रत्येक नेत्याचे विविध गट कार्यरत असून, त्यातून संघटनेतील बेबनाव वेळोवेळी समोर आला आहे. एवढेच नव्हे तर पक्षप्रमुखांकडे एकमेकांच्या तक्रारीही करण्यात आल्याने गटबाजी जाहीरपणे उघड झाली आहे. त्यामुळे पक्ष संघटनेकडे पदाधिकाऱ्यांचेच दुर्लक्ष झाल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करू लागले होते.
हेदेखील वाचा : ‘प्रत्येकाला धर्माचा…’ हिंदू संघटनांवर कडाडले AIMIM नेता वारीस पठाण, महाराष्ट्रातील नमाज वादावर भडकले, राजकारण तापणार?
अशातच स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेची निवडणुकीचे वातावरण तापण्यास मदत झाली आहे. परंतु पक्ष पातळीवर बैठका घेण्यापुरतेच संघटनेचे काम सीमित झाले आहे. अशात पक्षात शिस्त व गटबाजीला आळा घालण्यासाठी आमदार सुहास कांदे यांना पक्षाने बळ दिले आहे. कांदे हे भुजबळांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्या पक्ष संघटनेतील समावेशामुळे सामान्य शिवसैनिकांना बळ मिळण्याची शक्यता गृहीत धरून कांदे यांची जिल्हा संघटकपदी नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.