आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये महायुतीसोबत लढणार असल्याचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Political News : जत : संस्कार, संकल्प, सिध्दी, या त्रिसूत्रीवर चालणारी जनसुराज्य या संघटनेची बीजे जत तालुक्यात खोलवर रुझली आहेत, आपण जेव्हा या पक्षाची स्थापना केली, तेंव्हापासून जत तालुक्याने आपल्या संघटनेवर अपार प्रेम केले आहे. मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीत भलेही संघटनेचे काम थांबले होते. परंतु आता पुन्हा नव्या जोमाने आपणाला बांधणी करायची आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत आपली युती भाजप सोबतच असेल, असे प्रतिपादन जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी केले.
जत येथे पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष समित कदम, बसवराज पाटील एकुंडीकर, सुभाष गोब्बी, माजी सभापती सुजाता पाटील, संजय कांबळे, अॅड. शिवशंकर खटावे, विजय बागेळी, राजू ऐवळे, मारुती कोरे, राम मंडले, प्रवीण गडदे, संजय एम. पाटील, भीमाशंकर बिराजदार, राहुल मराठे, ऋषीकेश गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील संख, माडग्याळ, शेगाव, एकुंडी, जत शहर येथील अनेकांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी आमदार विनय कोरे म्हणाले, जत तालुक्याशी माझा ऋनानुबंध खूप जुना आहे. इथल्या माणसांनी आपल्या संघटनेला चांगली साथ दिली. बसवराजकाका पाटील, प्रभाकर सनमडीकर, तम्माराय्या खवेकर यांनी संघटनेसाठी मोठी मेहनत घेतली. त्यामुळे हा जिव्हाळा कायम राहिला. मागे जिल्हा परिषद, पंचायत समितीत आपण सत्तेत होतो. दोन विधानसभा आपण लढल्या. इथल्या माणसांसाठी वारणा दूध संघाच्या माध्यमातून धवलक्रांती निर्माण केली. उमदी सोनलगी भागात साखर कारखान्यासाठी आपण प्रयत्न केले. त्यामुळे लोक संघटनेशी कायम बांधले गेले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पुढे ते म्हणाले की, राजकीय स्थित्यंतरात आज अनेक सहकारी वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी त्यांनी संघटनेशी आणि माझ्याशी असणारा स्नेह कधी तोडला नाही. माझांही या तालुक्यावर तितकेच लक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नव्या पिढीला सोबत घेवून संघटनेची चांगली बांधणी करण्यावर भर राहिल, आपल्या संघटनेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी ताकदीने काम करावे, त्यांना लागेल ती ताकद देवू असेही आमदार कोरे म्हणाले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रास्ताविकात बसवराज पाटील एकुंडीकर यांनी मागे ज्या पध्दतीने जनसुराज्य हा जत तालुक्यातला निर्णायक पक्ष होता. इतकी ताकद आपण उभी करत आहोत. आज समित कदम यांचे जतवर बारकाईने लक्ष आहे. नुकतेच त्यांनी चार गावांना जिल्हा नियोजनमधून चाळीस लाख रूपये मंजूर केले आहेत. पुढच्या काळातही त्यांनी सावकरांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याला बळ देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यामुळे पक्षात चैतन्य आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन भूपेंद्र कांबळे यांनी केले. तर आभार राजू ऐवळे यांनी मानले.
स्थानिकलाही भाजप सोबत
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महत्वाच्या आहेत. यासाठी नेटांनी काम करण्याची गरज आहे. राज्यात आपण महायुती सोबत आहोत. इथेही आपणाला भाजप सोबत युती करून काम करावे लागेल. चांगल्या जागा आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यात आपण कमी पडणार नाही. विकासाचे सुराज्य आणण्याची चांगली विचारधारा घेवून पुढे जात आहोत, जनतेनीही साथ द्यावी, असे आवाहनही आमदार विनय कोरे यांनी केले.