आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार
मुंबई : दिल्लीमध्ये भाजपचा विजय झाला तर आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. 27 वर्षांनंतर भाजपला दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यामध्ये यश मिळाले आहे. यामुळे देशभरामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून व नेत्यांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे. मात्र यामध्ये कॉंग्रेसला एकही जागा मिळालेली नाही तर आपला 22 जागा मिळाल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांचा देखील पराभव झाला आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. दिल्लीमध्ये झालेल्या पराभवाचे देखील त्यांनी विश्लेषण केले आहे. यावेळी त्यांनी आप व कॉंग्रेस पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढण्याची गरज होती अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात, निवडणुकीत जय-पराजय होत असतात. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून निवडणुका लोकशाही पद्धतीने लढल्या जात नाहीत. निवडणुका सैतानी पद्धतीने लढल्या जात आहेत. आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी मग साम, दाम, दंड, भेद अशा सर्व गोष्टींचा वापर केला जातो. मतदार याद्यांमधील घोटाळा महाराष्ट्रात पाहिला तोच आपल्याला दिल्लीत दिसतो आहे. उद्या बिहारमध्ये हेच दिसेल. असाच प्रकार हरियाणातही दिसला. पण आता या सर्वांचा बाऊ न करता पुढल्या लढाईसाठी विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी अण्णा हजारे यांना देखील निशाण्यावर धरले. खासदार संजय राऊत म्हणाले की, “अण्णा हजारे काय म्हणतात त्याला काही अर्थ राहिला नाही. ते अचानक जागे होतात. महाराष्ट्रात एवढा भ्रष्ट्राचार झाला, लोकशाहीवर हल्ले झाले तरीही अण्णा हजारे यांनी कधीही हालचाल केली नाही. मात्र, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने अण्णा हजारे यांना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर मी काल आनंद पाहिला. हे लोकशाहीला मारक आहे. अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यामुळे अण्णा हजारे देशाला माहिती झाले. पण गेल्या 10 वर्षांत देशात अनेक संकटे आली, देश लुटला जात आहे. अनेकांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले ते आज सर्व भाजपाबरोबर आहेत. मग अण्णा हजारे यांना त्याबाबत मत व्यक्त करावं असं वाटत नाही का? त्यामागचं रहस्य काय आहे?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे,
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या पराभवाचा आनंद अण्णा हजारे किंवा काँग्रेसला झाला असेल तर याचं दु:ख वाटतं. कारण अरविंद केजरीवाल जरी निवडणूक हरले असले तरी भाजपा विजयी झालं आहे. दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढले असते तर आज निकाल वेगळा लागला असता हे आकड्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकत्र यायचं की नाही? याबाबत सर्वांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. यामुळे लोकशाही टिकेल का? विरोधी पक्षांचा आवाज राहिल का?” असे मत देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.